केशोरी : २०२०-२१ च्या खरीपातील वनजमीन अतिक्रमण पट्टेधारक शेतकऱ्यांच्या धान पिकाचे तसेच सन २०१९-२० मधील खरीप व रब्बी हंगामातील बारदान्याचे पैसे अद्याप आदिवासी विकास महामंडळाकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या कारभारावर शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामातील वनजमीन अतिक्रमण पट्टेधारक शेतकऱ्यांचे धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रामधून आदिवासी विकास महामंडळाने डिसेंबर महिन्यात खरेदी केले होते. आता याला ४ महिन्यांचा कालावधी लोटला असूनही शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे बँक खात्यात जमा झाले नाही. यासंद उपप्रादेशिक अधिकारी (नवेगावबांध) यांना वेळोवेळी विचारणा केली जाते. परंतु त्यांचेकडून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने शेतकरी महामंडळाविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातील धान महामंडळाला विकण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील बारदाना दिला होता. तत्कालीन अधिकाऱ्यांनी २० रुपयांप्रमाणे बारदान्याची किंमत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगितले होते. परंतु त्याला आता १ वर्षाचा कालावधी लोटूनही बारदान्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाळे नाहीत. बारदान्याचे पैसे आणि वनजमीन अतिक्रमण पट्टेधारक शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे त्वरीत महामंडळाने देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी विनोद पाटील गहाणे, दिनेश पाटील रहांगडाले व शेतकऱ्यांनी केली आहे.