बाेंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी (चान्ना) येथील शेतकऱ्यांनी शेतामधील मोटारपंपाला वीजजोडणी व्हावी म्हणून वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्ज केला. वीजजोडणीसाठी आवश्यक असलेले डिमांड सुद्धा शेतकऱ्यांनी भरले. मात्र तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटूनही महावितरणनेे विद्युतपुरवठा सुरू केला नाही. परिणामी शेतकऱ्यांना शेतीला सिंचन करण्या पासून वंचित राहावे लागत आहे. महावितरणने याची त्वरित दखल घेऊन वीजपुरवठा न केल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा एकनाथ शहारे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.
बाक्टी येथील आठ शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत शेतामध्ये विहिरी खोदल्या विहिरीत बोअरवेल खोदून पाण्याचा संचित साठा निर्माण झाला. गावातील जमीन कोरडवाहू आहे. मुबलक प्रमाणात जलसिंचनाच्या सोयी नसल्यामुळे बारमाही पिके घेता येत नाही. शेती हाच एकमेव व्यवसाय गावकऱ्यांचा आहे. अख्ख्या कुटुंबाचा प्रपंच शेतीवर अवलंबून आहे. कर्जबाजारी होऊन शेतामध्ये पाण्याची सोय करतो. पैशाची जुळवाजुळव करुन वीज जोडणीसाठी आवश्यक रकमेचा डिमांड वीज वितरण कंपनीमध्ये जमा करतो. कृषी जोडणीसाठी आवश्यक रकमेचा डिमांड वीज वितरण कंपनीमध्ये जमा करतो. कृषी जोडणीसाठी वीज कंपनीने तत्पर राहणे गरजेचे असताना संबंधित अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहे. दोन वर्षांपासून डिमांड भरून सुद्धा शेतामध्ये वीज जोडणीसाठी कमालीची दिरंगाई केली जात असल्याचा आरोप बाक्टी येथील आठ शेतकऱ्यांनी केला आहे.
बॉक्स....
शेतकऱ्यांनी जगायचे कसे?
शेतीमधून बारमाही पिके घेण्यासाठी शेतात पाण्याची सोय केली. विद्युत विभागाच्या नाकर्तेपणामुळे आजतागायत वीज जोडणी झाली नाही. शेतामध्ये मुबलक पाण्याची सोय असताना सुद्धा मनाजोगे उत्पादन घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांचा वाली कोण आहे, पाणी असून, पिके घेता येत नाही. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था दूर होणार कशी, येत्या आठ दिवसांत वीज जोडणी झाली नाही तर आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा एकनाथ शहारे या शेतकऱ्यांनी दिला.
बॉक्स.....
निविदा निघाल्या नाही
नव्याने वीजजोडणीच्या कामाचे निविदा काढाव्या लागतात. या कामाचे टेंडर निघाले नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना नव्याने वीजजोडणी कनेक्शन देण्यास विलंब होत आहे.
- अमित शहारे, उपविभागीय अभियंता, वीज वितरण कंपनी, अर्जुनी मोरगाव