बिरसी फाटा : गोंदिया येथील मेडिकलच्या प्रयोगशाळेतील कर्मचारी कोरोनाबाधित आल्याने आरटीपीसीआर चाचण्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. आठ-आठ दिवस चाचणी केल्यानंतर अहवाल प्राप्त होत नसल्याने तपासणी करणारेसुध्दा संभ्रमात असून, आपण कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, हे कळण्यास त्यांना मार्ग नाही. त्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात येत असल्याने कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.
तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात येथे कोरोना चाचणी रिपोर्टकरिता चाचणी करणाऱ्यांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. मात्र येथे कार्यरत डॉक्टर त्यांना गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त व्हायचा असल्याचे सांगून परत पाठवित आहेत. गोंदिया प्रयोगशाळेत नमुन्यांच्या तपासणीचे कर्मचारी बाधित आल्याने कमी झाले आहे. सद्य स्थितीत प्रयोगशाळेकडे साडेपाच हजारांवर स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने स्वॅब नमुने तपासणी करणाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर हळूहळू कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोरोना चाचण्या करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र आता चाचण्यांचा अहवाल मिळण्यास विलंब हाेत असल्याने नागरिकांच्या समस्येत पुन्हा वाढ झाली आहे.
...........
स्वॅब नमुन्यांची गती वाढवा
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशात आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रयोशाळेत स्वॅब नमुने तपासणीची गती वाढविण्याची मागणी तिरोडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमाईवार व सचिव विजय खोब्रागडे यांनी केली आहे.