वर्षभरापूर्वीच डिमांड भरला : शेतकऱ्यास अडवणुकीचा प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : जलसिंचनाच्या सोयीअभावी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मनाजोगे शेतामजून पिके घेता येत नाही. निर्धारित पाण्याच्या अभावाने हाती येणाऱ्या पिकांपासून सध्या मुकावे लागत आहे. गेल्या वर्षभरापासून शेतामध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक रकमेसह डिमांड भरुनसुद्धा वीज वितरण कंपनीला जाग आली नाही. आजपावेतो त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत जोडणी करण्यात आली नाही. वीज कंपनीचा दिरंगाईपणा कास्तकारांना भोवत आहे. याबाबद त्रस्त शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव येथील अल्पभूधारक शेतकरी बळीराम आत्माराम गोबाळे यांनी शेतामध्ये पाण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे, स्वत: पैशाची जमवाजमव करुन बोअर मारले. पाणीसुद्धा लागले. बोअरला ३ एचपीची इलेक्ट्रीक मोटार लावून संपूर्ण शेताचा पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे रितसर अर्ज केला. कास्तकाराच्या अर्जाला संमती दिल्याने बळीराम गोबाडे या कास्तकाराने ५ हजार २०० रूपयांची डिमांड १० मे २०१६ रोजी रोख स्वरुपात भरणा केला. डिमांडची रक्कम भरुन एक वर्षाचा कालावधी होऊनसुद्धा लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजपावेतो विद्युत पुरवठा करण्यात आला नाही. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु यंत्रणा चालविणारे शासकीय अधिकारी कामचुकारपणा करणारे असतील तर शेतकरी दु:खामधून बाहेर कसा निघणार, याचेही आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. शेतीसाठी वीज पुरवठा करण्यात दिरंगाई करणाऱ्यांवर सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा वचक राहिलेला दिसत नाही. त्यामुळे आज तालुक्यातील यंत्रणा आपल्या मर्जीने वागत आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याच्या वीज जोडणीसाठी एका वर्षाचा तप करावा लागतो, हे त्या शेतकऱ्याचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
वीज पुरवठा करण्यास दिरंगाई
By admin | Published: May 27, 2017 12:48 AM