गोरेगाव : वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाला वारंवार पत्र दिले; पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. जमिनीची मोजणी करूनसुद्धा अतिक्रमण हटविण्यात आले नाह; त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने सोमवारपासून (दि. २१) आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
प्राप्त माहितीनुसार पुरणलाल आसाराम पारधी यांची तालुक्यातील कलपाथरी येथील भू. क्र. १७ (सरकार)वर लगतच्या शेतकऱ्यांनी वहिवाटी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, महसूल विभागाने अद्यापही हटविलेले नाही. पुरणलालने अनेक वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी करूनसुद्धा गैरअर्जदाराचे अतिक्रमण काढण्यात आले नाही. या संदर्भात अर्जदाराला १५ जून रोजी तोंडी तारीख देण्यात आली होती; परंतु अजूनपर्यंत कोणतीच नोटीस दोन्ही पक्षांना मिळालेली नाही.
सध्या शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे. अर्जदाराला शेतात पिकाची पेरणी करण्यासाठी ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. पुरणलाल पारधी यांनी १६ जूृन रोजी तहसीलदारांच्या आदेशावर भूमिलेख मंडळ अधिकारी मेश्राम व तलाठी पंचबुद्ये यांनी मोका पंचनामा केला; परंतु अद्यापही अतिक्रमण काढण्यात आले नाही. मंडल अधिकारी आणि अभिलेख विभागातील अधिकारी सोबत असता सीमांकन काढून दिल्यावर लाकडी खुंट्या मारून अतिक्रमण केलेल्या जागेला ताब्यात घेण्यात आले होते. गैरअर्जदाराने रोवलेल्या खुंट्या काढून फेकल्या व शासकीय नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. जोपर्यंत आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात येत नाही; तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा पुरणलाल पारधी यांनी दिला आहे.