मुंडीकोटा : कोरोनामुळे रेल्वे बंद झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. अशातच दिलासा म्हणून सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत. पण या गाडीचा या परिसरातील प्रवाशांना काहीच उपयोग नाही. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
कोरोनाने अनेक दारिद्र्यरेषेखालील व सामान्य नागरिकांचे जगणे हलाखीचे केले आहे. अशातच कामासाठी बाहेर पडणारी जनता ही गरीब आहे. अशा परिस्थतीत जीवन जगताना जनतेला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्य स्तरावर जगणाऱ्या नागरिकांनी पॅसेंजर व लोकल ईतवारी ते रायपूर, ईतवारी-डोंगरगढ, ईतवारी-बालाघाट, ईतवारी ते टाटानगर या पॅसेंजर गाड्या अनेक वर्षांपासून धावत होत्या. या गाड्या कोरोनामुळे बंद पडल्या आहेत. या गाड्यांचा लहान स्टेशनवर थांबा नाही. तालुक्याच्या व शहराच्या ठिकाणी बसने जाणे पडवडत नाही. तसेच आपले काम करून येणे-जाणे सोयीचे नाही. एसटीचे भाडे रेल्वेपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे सामान्यांची लूट होत असते. सवलती योजनांसह पुरेशा सुविधा या सामान्यांच्या हक्काच्या आहेत व असतात हे प्रशासनाने जाणून घ्यावे. फक्त एकच लोकल गाडी सुरू झाली असून ती ईतवारी स्टेशनवरून दुपारी ३ वाजता सुरू असते. तीच गाडी दुसऱ्या दिवशी गोंदिया स्टेशनवरून सकाळी १० वाजता सुटते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. गोंदियाला जाण्याकरिता लोकल गाडी नसल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून काळ्या-पिवळ्या वाहनाने प्रवास करावा लागतो.
.....
पॅसेंजर व लोकल सुरू करण्याची मागणी
नागरिकांसाठी पॅसेंजर व लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी मुंडीकोटा, गंगाझरी, काचेवानी, खात, रेवराल, तारसा या गावांतील गावकरी करीत आहेत.