रोजगार सेवकांना अत्यल्प मानधन
गोरेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झटणारे रोजगार सेवक संकटात आहेत. लोकांच्या हाताला काम द्यावे म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात त्यांची जबाबदारी आहे. मनरेगा कामाची जबाबदारी पार पाडणाऱ्या रोजगार सेवकांनाच अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. रोजगार सेवकांच्या या मागणीकडे शासनाने लक्ष देऊन ही मागणी लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी रोजगार सेवक संघटनेने केली आहे.
घोगरा ते देव्हाडा रस्त्याची दुरवस्था
मुंडीकोटा : जवळील ग्राम घोगरा ते देव्हाडा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. हा रस्ता अपघाताला आमंत्रण ठरत आहे. घोगरा ते देव्हाडा या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. गिट्टी व मुरूम उखडून बाहेर रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. हा रस्ता पूर्णपणे जीर्ण आहे.
अभयारण्यामुळे शेतजमिनी ओसाड
पांढरी : जल, जंगल, जमीन, प्राणी यांचे संवर्धन करताना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्याची निर्मिती आवश्यक असली तरी मानवी हिताचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्यात समाविष्ट असलेल्या शेतजमिनीचे अधिग्रहण अद्याप झाले नाही.
रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ
तिरोडा : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे.
कार्यालयातून तक्रारपेट्या गायब
गोंदिया : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. तक्रारी निराकरण करण्यासाठी वरिष्ठांकडे जाणार या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र, आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. संबंधितांची तक्रार कुठे करावी? असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. त्यामुळे अनेक समस्या कायम आहेत.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकालगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधी पसरते. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त
तिरोडा : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे डासांचे निर्मूलन करणे गरजेचे आहे.
प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
गोंदिया : व्यापारी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ग्राहक, व्यापाऱ्यांची कुचंबणा होत आहे. प्रसाधनगृहाची मागणी केली जात आहे.
गौण खनिज चोरीकडे दुर्लक्ष!
सडक-अर्जुनी : महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतील गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे; परंतु महसूल विभाग केवळ रेती तस्करांच्या मागावर असतो.
प्रदूषण रोखण्याकडे मंडळाचे दुर्लक्ष
आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई होत नाही.