कोरोना महामारीच्या साथ रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी शासन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणीची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांवर ठेवून मोकळे होत असते. कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी कमी पडत असून, शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभागातून प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते. गावातील प्रत्येक घराघराला भेटी देऊन संशयित रुग्ण शोधून त्यांना इतरत्र कुठेही भटकू न देता होम क्वाॅरंटाईन करून आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांवर औषधोपचार करण्यास मदत होईल. परिणामी कोरोना रुग्ण संख्येस आपोआप आळा बसेल, गाव कोरोना बचाव समितीने दैनंदिन कार्य कोणती केली याचा आढावा गावातील सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक घेतील. कोरोना महामारीच्या भीतीमुळे नागरिक कोरोना संबंधीची माहिती देण्यासाठी घाबरत आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस फुगत आहे. यापूर्वी पहिल्या कोरोना टप्प्यातील निर्माण केलेल्या गाव कोरोनासे बचाव समित्यांनी उत्कृष्ट कार्य करून शासन दरबारी छाप पाडली आहे. त्यामुळे नव्याने ग्रामपंचायत स्तरावर कोरोना बचाव समिती स्थापन करण्याची मागणी होत आहे.
कोरोना बचाव समिती स्थापन करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:25 AM