केशोरी : येथील एचडीएफसी बँक शाखेत एक व्यवस्थापक आणि एक रोखपाल कार्यरत असून, केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर बँकेच्या कामकाजाचा डोलारा सुरु आहे. या बँकेत केशोरीसह परिसरातील महिला बचतगट, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सामान्य नागरिकांची बँक खाती आहेत. केवळ दोन कर्मचारी या बँकेतील कामकाज चालवत असून, बँकेच्या कामकाजाची वेळ दुपारी २.५०पर्यंत असल्यामुळे ही निश्चित केलेली वेळ खातेधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. परिणामी खातेधारकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या बँकेच्या कामकाजाची वेळ किमान दुपारी ३.५०पर्यंत वाढविण्याची मागणी खातेधारकांनी केली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील एचडीएफसी बँक शाखेत केवळ दोन कर्मचारी कार्यरत असून, या बँकेत केशोरीसह परिसरातील व्यापारी बचतगट, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात खाती आहेत. या बँकेच्या व्यवहारासाठी निश्चित केलेली वेळ २.५०पर्यंतच असल्यामुळे या वेळेच्या आत जेवढ्या खातेधारकांची कामे आटोपता येतील तेवढी कामे तत्परतेने येथील दोन्ही कर्मचारी आटोपण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. परंतु, बँकेच्या कामकाजाची वेळ कमी पडत असल्यामुळे दिलेल्या वेळेत खातेदारांची कामे होत नाहीत. परिणामी खातेधारकांना बँकेतून कामाविनाच परत जावे लागते. परिणामी खातेधारकांना कमालीचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. सर्व बँक रिझर्व बँकेच्या अधिपत्याखाली काम करत आहेत. जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कामकाजाची वेळ ३.५०पर्यंत असताना केवळ एचडीएफसी बँक शाखेची कामकाजाची वेळ २.५०पर्यंतच का, असा प्रश्न खातेधारकांनी उपस्थित केला आहे. या बँक शाखेच्या कामकाजाची वेळ ३.५०पर्यंत वाढविण्याची मागणी खातेधारकांनी केली आहे.