सडक - अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६ वर कोहमारा गाव आहे. मात्र, कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वेस्थानकलगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधीसुद्धा पसरते.
स्त्यावर पडलेले खड्डे बुजवा
गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
तिरोडा : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
शहरातील मजुरांच्या हाताला काम द्या
गोरेगाव : येथे नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून गेल्या पाच वर्षांत शहरातील एकाही मजुराला मग्रारोहयोचे काम मिळाले नाही. त्यामुळे मजुरांवर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे भविष्य व उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने शहरातील मजुरांना मग्रारोहयोची कामे देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाने केली आहे.
बाजारातील रस्ते मोकळे करा
गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी रस्ते अडचण होते.
गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात
परसवाडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडमोहाळी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्च रोजी पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे; पण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसून, पाच महिन्यांत संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. अशातच अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
सालेकसा : तालुक्यातील काही गावांत व्यायाम शाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायमशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गावांत ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र, अजूनही काही गावांत व्यायामशाळा नाही. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहेत. मात्र, भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.
अर्धवट बांधकामाचा बसतोय फटका
गोरेगाव : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर फाटक नसलेल्या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच अपुऱ्या मनुष्यबळाअभावी रेल्वेमार्गावर फाटक उभारण्यास अडचणी निर्माण होत असल्याने रेल्वे विभागाकडून मागील १० ते १५ वर्षांपूर्वी अनेक रेल्वेमार्गावर बोगद्याचे काम सुरू आहे; पण हे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
खतांचा अतिवापर धोकादायक
बोंडगावदेवी : चांगले पीक घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत आहेत; परंतु अलीकडे या खतांचा अतिवापर होत आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता अन्न प्रशासन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली
पांढरी : गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मार्च महिन्यापासून आजपर्यंत ९ महिन्यांचा कालावधी संपला असून, कराची रक्कम ग्रामपंचायतीला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही. त्यामुळे गावविकासाची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे मोबाइलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ
सौंदड : शेतकरी रासायनिक खाताचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे आजारांत वाढ झाली आहे. यावर तोडगा म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.