परसवाडा : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रमाई, शबरी घरकूल मंजूर घरकुलाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वळती करण्यासाठी लाभार्थ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन हा गैरप्रकार थांबविण्याची मागणी केली जात आहे.
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत ९५ ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र येत असून, १२५ महसुली गावे आहेत. या गावांतील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास, सबरी, रमाई योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले आहे. त्या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकूल योजनेची रक्कम तीन टप्प्यांत जमा केली जाते. परंतु, प्रधानमंत्री आवास योजना विभागातील काही कंत्राटी अभियंता लाभार्थ्यांकडून खात्यात पैसे जमा करून देण्याच्या नावाखाली पैसे घेत असल्याचा आरोप आहे. प्रथम हप्ता दोन हजार, द्वितीय पाच हजार, शेवटी तीन हजार रुपये असे टप्प्याटप्प्याने जात असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले. याची तक्रारसुद्धा खंडविकास अधिकाऱ्यांना करण्यात आली. पण, अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन हा प्रकार त्वरित थांबविण्याची मागणी केली आहे; अन्यथा या विरोधात आंदाेलन छेडण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
....
रेती टंचाईचा फटका
तिरोडा तालुक्यात घरकुुलाचे बांधकाम सुरू असले तरी रेती टंचाईचा सामना लाभार्थ्यांना करावा लागत आहे. अद्याप तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे घरकूल बांधकामासाठी रेती मिळणे कठिण झाले आहे. अनेक लाभार्थी तस्करीतील रेती चढ्याभावाने विकत घेऊन काम करीत आहे. रेतीसाठी गावागावात लाभार्थ्यांची भटकंती सुरू आहे. शासनाने पाच ब्रासपर्यंत रेती मोफत देण्याचे घोषित केले असले तरी रेती मिळणेच तिरोडा तालुक्यात कठिण झाले आहे.