गोंदिया : जप्त केलेला रेतीचा टिप्पर सोडण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या गोरेगावचे तहसीलदार, एक नायब तहसीलदार व एका खासगी व्यक्ती विरुद्ध गोंदियाच्या लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई मंगळवारी (दि.७) सायंकाळी केली.
गोरेगावच्या तहसील कार्यालयातील तहसीलदार किसन भदाणे, नायब तहसीलदार नागपुरे व तहसील कार्यालयातील कार्यरत असलेला संगणक चालक गणवीर या तिघांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्यामुळे त्या तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एप्रिल महिन्यात एक रेतीचा टिप्पर गोरेगाव तहसील कार्यालयाने पकडला होता. तो रेतीचा टिप्पर सोडण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्रस्त झालेल्या ४० वर्षाच्या गिधाडी येथील फिर्यादीने याची गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपली तक्रार नोंदविली. त्यानुसार ७ मे रोजी सापळा रचून सांकेतिक मागणीवरून त्या तिघांवर गोरेगाव पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१२,१३ (१),(अ), सहकलम ४६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
...................अधिकाऱ्यांच्या घरावर धाडी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोरेगाव येथील तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यावर कारवाई केल्यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरावर धाड टाकून जप्तीची कारवाई सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.