देवरी : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगीक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी तालुका भाजप महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे तहसीदारांना देण्यात आले.
निवेदनातून सामाजिक न्याय यासारखे मंत्रीपद भुषविणाऱ्या व्यक्तीने आपले दुसऱ्या महिलेशी संबंधाची कबुली दिली आहे. त्यामुळे मंत्री पदावरील व्यक्ती अशा पद्धतीने वर्तन करीत असेल तर त्यातून समाजाला काय संदेश जाईल, याचा विचार करावा लागणार आहे. मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धडपड ही महिला करीत आहे. मुंडे यांच्याविरूद्ध करण्यात आलेल्या आरोपाचे स्वरुप बघता व आरोपाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा. अथवा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारासुध्दा यावेळी दिलेल्या निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष देवकी मरई, सविता पुराम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नूतन सयाम, माया निर्वाण, रचना उजवणे, गोमती तितराम, कल्पना वालोदे, सुनीता जांभुळकर, प्रज्ञा संगीडवार, शोभा शेंडे, कौसल्या कुंभरे यांचा समावेश होता.