गोंदिया : पावसाळ्यात जुन्या झालेल्या जीर्ण इमारती पडून त्यामुळे जीवितहानी झाल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत. मात्र असे प्रकार घडू नयेत यासाठी इमारत मालक, भोगवटदार व भाडेकरूंनी जीर्ण इमारत स्वखर्चाने पाडून टाकाव्यात, असे फर्मान नगर परिषदेने काढले आहे.
कित्येक वर्षांचे जुने बांधकाम असलेल्या इमारतींना पावसाळ्यात सर्वाधिक धोका असतो. पावसाळ्यात अशा इमारती पडून कित्येकांचा जीव गेल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अशात पावसाळ्यापूर्वी नियोजनांतर्गत नगर परिषदेच्या नगररचना विभागाने शहरातील अशा जीर्ण इमारतींपासून जीवित व वित्तहानी घडू नये यासाठी हालचाल सुरू केली आहे. याअंतर्गत विभागाने अशा जीर्ण इमारत मालक, भोगवटदार व भाडेकरूंनी धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारती किंवा त्यांचा धोकादायक भाग पाडून घेण्याबाबत नोटीस काढली आहे. तसेच अशा इमारती पडून होणाऱ्या जीवित व वित्तहानीस नगर परिषद जबाबदार राहणार नाही, असेही कळविण्यात आले आहे. याशिवाय, शहरात नदीकाठी अनधिकृतपणे राहणाऱ्या नागरिकांनाही पावसाळा बघता अनधिकृत घरे इतरत्र हलविण्याची व्यवस्था करण्याबाबत नगर परिषदेने सुचविले आहे. त्यांचीही काही जीवित वा वित्तहानी झाल्यास नगर परिषद अथवा शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देता येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.