काचेवानी : पावसाळ्याचे दिवस आले की सगळीकडे घाण असते. या घाणीतून अनेक प्रकारचे डास, विषाणू, व किडे उत्पन्न होतात. पावसाळ्यात मानसापासून तर जनावरे व पशुपक्ष्यांना हे दिवस आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्रासदायी व घाबरण्यासारखे असतात. या दिवसात सर्वांना काळजी घेणे महत्वाचे असते. जनतेमध्ये आरोग्याची भीती तर आरोग्य विभागाला जनतेत होणाऱ्या रोगराईची भीती असते. विविध प्रकारच्या गंभीर आजाराने जनता व आरोग्य विभाग दहशतीत असतो. अशावेळी जनता आणि आरोग्य विभागाने नेहमी संपर्कात राहण्याची गरज आहे.पावसाळ्यात तीन प्रकारच्या डासांपासून प्रत्येक नागरिकाने स्वत:चा बचाव करुन घेण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाने नागरिकांना सावधान केले आहे. यावेळी डेंग्यू, हत्तीरोग आणि मलेरिया या रोगांची भीती सर्वांना असते. हे सर्व रोग डासांपासून उपजत असून त्वरीत उपचार करण्यात आले नाही तर माणूस दगावतो. याकरिता सर्व नागरिकांनी सावध रहावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.डेंग्यू, हत्तीरोग आणि मलेरिया हे तिन्ही रोग डासांपासून होत असून डास तीन प्रकारचे आहेत. डेंग्यूच्या डासाला इजिप्ती म्हणतात. हा डास साचून असलेल्या स्वच्छ पाण्यात राहतो. मात्र डॉक्टर या रोगाला नियंत्रीत करण्याकरिता उच्च स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत प्रयत्नशील आहेत. त्वरीत काळजी घेतल्यास डॉक्टरांना उपचार करणे सोईस्कर होते, असे डॉक्टरांचे मत आहे.इजिप्ती (डेंग्यू) नावाच्या डासाबद्दल बोदा क्षेत्राचे एम.पी.डब्ल्यू. डॉ. पी.एस. बरईकर यांनी सांगितले की, हा डास एका वेळी ३०० ते ४०० अंडी देतो. याची उत्पत्ती तीव्र गतीने होत असल्याने नागरिकांनी घराच्या आवारात असलेले स्वच्छ पाण्याचे साचलेले साहित्य राहणार नाही किंवा ते खाली करुन ठेवावे. मडके, टाकी, टायर आदीमध्ये साचून असलेल्या स्वच्छ पाण्यात डास असतात आणि त्या ठिकाणी अंडी घालतात. या डासांमुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे डोके लालसर होणे, तापात चढ-उतार होणे, मळमळ वाटणे, उलट्या होणे, डोकेदुखी होणे, असे डॉ. बरईकर यांनी लोकमतला सांगितले. असे लक्षण दिसून आल्यास निष्काळजीपणा न करता आरोग्य विभागात जावून डॉक्टरांचा सल्ला व उपचार घ्यावे, असा सल्ला दिला आहे.डासांमुळे होणाऱ्या दुसरे आजार म्हणजे हत्तीरोग. याच्या डासाला क्युवलेस म्हणतात. हा डास साचलेल्या घाणेरड्या पाण्यात, नाल्यात आणि गटारात असतो. हा डाससुद्धा ३०० ते ४०० अंडी देत असून अंडीपासून तर त्याची संपूर्ण वयोमर्यादा ४८ दिवसांचे असते. वास्तविक पाहता तिन्ही प्रकारच्या डासांचे जीवनमान एकसारखेच असते. प्रभावशील असण्याचा काळ २१ दिवसांचा असतो, असेही आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.डासांचा तिसरा प्रकार म्हणजे अॅनाफिलीस. यालास मलेरिया डास म्हणतात. ती चावते आणि त्यापासून मलेरिया रोग होतो. या डासांचा जीवनकाळ वरीलप्रमाणेच असतो. यापासून होणाऱ्या रोगाची लक्षणेसुद्धा मिळते-जुळते अर्थात एकसारखे असतात, असे मलेरियाचे डॉ. पी.सी. बरईकर यांनी सांगितले.पावसाळ्याचे दिवस आल्याने प्रत्येक ठिकाणी पाणी साचून राहणे, घाण असणे हे स्वाभाविक असले तरी प्रत्येक नागरिकाने अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. परिसरातील असलेली घाण धुवून काढणे, स्वच्छ करणे, घर, परिसर, वास्तव्याची जागा स्वच्छ करणे आवश्यक आहे. औषधाचा वापर करावे. प्रत्येक नागरिकाने किंवा कुटुंबाने घरचे व बाहेरचे सर्व पाणी बाहेर टाकून घर कोरडे ठेवावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)
डेंग्यू, मलेरिया पाय पसरतोय
By admin | Published: July 24, 2014 11:55 PM