गोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात मलेरिया, डेंग्यूने डाेके वर काढले होते. शहरातील छोटा गोंदिया परिसरातसुध्दा डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता, तर दोन रुग्णांचा मृत्यूसुध्दा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मलेरियाच्या सर्वाधिक नोंद सालेकसा तालुक्यात झाली होती, तर चिकुनगुनियाचा जिल्ह्यात शिरकाव झाला नाही. डेंग्यू आणि मलेरियाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि हिवताप नियंत्रण विभागाच्यावतीने आशा सेविका, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. शिवाय नगर परिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून डासनाशक फवारणी करण्यात आली. ज्या भागात डेंग्यू आणि मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळले, त्या भागात आरोग्य शिबिर लावून रक्ताचे नमुने घेऊन त्वरित औषधोपचार सुरु करण्यात आले. त्यामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत झाली. ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूच्या १२२, तर मलेरियाच्या ३६७ रुग्णांची नोंद झाली होती.
..............
राेज किमान दोन ते तीन पेशंट
जिल्ह्यात आता मलेरिया आणि डेंग्यूचा संसर्ग आटोक्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ओपीडीमध्ये दररोज दोन ते तीन मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र, पूर्वीच्या तुलनेत आता रुग्ण संख्येत घट झाली आहे.
...............
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण
डेंग्यू : २०
चिकुनगुनिया : ०
काविळ : ६५
......................
लहान मुलांचे प्रमाण जास्त
- शासकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या ओपीडीमध्ये ९० ते १०० बालकांची तपासणी केली जात आहे. यात डेंग्यू आणि मलेरियाची लक्षणे असलेल्या बालकांची संख्या चार ते पाच आहे.
- सध्या डेंग्यू, मलेरियापेक्षा बालकांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण अधिक आहे. वातावरणातील बदलामुळे निमोनियाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे.
- लहान बालकांची रोग प्रतिकारशक्ती कमी राहात असल्याने वातावरणातील बदलांचा त्याच्या आरोग्यावर लवकर परिणाम होतो.
..............
डेंग्यू, मलेरियाचा संसर्ग आटोक्यात
जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाचा संसर्ग आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शिवाय काही भागात आरोग्य शिबिरसुध्दा लावण्यात येत आहे. त्यामुळे संसर्ग आटोक्यात आहे.
- नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
..................
काय आहेत लक्षणे
डेंग्यू : ताप येणे, डोके दुखणे, डोळे लाल होणे, डोळ्यांचा त्रास वाढणे, प्लेटलेट कमी होणे, उलट्या होणे.
चिकुनगुनिया : जाईंट पेन होणे, ताप येणे, उलट्या होणे, सांधे दुखणे.
काविळ : डोळे पिवळसर होणे, ताप येणे, वारंवार उलट्या होणे, लिव्हरवर परिणाम होणे.
...................
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत आढळलेले वयोगटनिहाय डेंग्यूचे रुग्ण
० ते ६ : २
६ ते १८ :१९
१८ ते ३५ :५३
३५ वर्षांवरील : ४८
......................