गोंदिया : शेतकरी आंदोलनाला समर्थन करून पारित तिन्ही काळे कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीला घेऊन वंचित बहुजन आघाडी ५ मार्चला प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश बन्सोड यांनी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला राजू राहूलकर, एस. डी. महाजन, विनोद मेश्राम, प्रकाश डोंगरे, प्यारेलाल जांभूळकर, विनोद मेश्राम, सिध्दार्थ हुमने, प्रफुल्ल लांजेवार, वामन मेश्राम, जवीन खोब्रागडे उपस्थित होते. शेतकरी आंदोलनाला समर्थन करून पारित तिन्ही काळया कायद्यांचा विरोध, कोरोनाच्या नावावर चाललेल्या प्रशासकीय धोरणांचा निषेध करून कष्टकरी, मजूर, शेतकरी यांच्या रोजगाराची व्यवस्था करण्यात यावी, जि. प. व पं.स. निवडणुका स्वबळावर आणि पूर्ण जागेवर लढण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. सर्व स्तरातील संघटनेच्या शाखा बांधणीचे कार्यक्रम वंचित समाजास जोडणे ही कार्यप्रणाली राबविणार आहोत. गाव तेथे शाखा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बिरसी विमानतळ, गोंदिया परिसरातील अतिक्रमणधारकांवर झालेले अन्याय दूर करण्यात यावा, विमानतळ परिसरात कार्य करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, कर्मचारी यांच्या प्रश्नावर आंदोलनात सहभाग घेणे, वाढत असलेली महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस मूल्यवृध्दीविरोधात आंदाेलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.