तिरोडा : तालुक्यात कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध प्रयोगांची कृषी उपसंचालक विष्णू साळवे यांनी शनिवारी (दि.६) पाहणी केली. यासाठी त्यांनी तालुक्यात ठिकठिकाणी भेट दिली.
यांतर्गत, ग्राम कवलेवाडा येथील गोपीचंद नंदराम पारधी यांच्या शेतात भेट देऊन राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत घेण्यात आलेले रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिक प्रक्षेत्राची पाहणी केली. प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर फुले रेवती या ज्वारीच्या वाणाची लागवड करण्यात आली आहे. पीक वाढीत असून, कणस भरण्याच्या अवस्थेत आहे. यावेळी शेतकऱ्यांना ज्वारी पिकाचे महत्त्व पौष्टिक गुणधर्मांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर ग्राम गराडा येथील विजय गजानन बारापात्रे यांच्या क्षेत्रावर राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन व मल्चिंग तसेच भाजीपाला लागवड पिकाची पाहणी साळवे यांनी केली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत गराडा येथील माधुरी आशिष ठाकूर यांना देण्यात आलेल्या ट्रॅक्टरची पाहणी केली, तसेच भिवापूर येथे मालता पवन भगत यांच्या शेतावर भेट देऊन आत्मा अंतर्गत रब्बी पीक प्रात्यक्षिक मोहरी वाण (शताब्दी)लागवड प्रक्षेत्राची पाहणी करून महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये रब्बी हंगामात तेलवर्गीय पिकाला जिल्ह्यात वाव असल्याने करडई, तसेच मोहरी पिकाचे क्षेत्र वाढविण्यास त्यांनी सांगितले. औजार बँक योजनेचा लाभ घेण्याविषयी उपस्थित महिला गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या क्षेत्रीय भेटीला तालुका कृषी अधिकारी डी. एल. तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी वाय. बी. बावनकर, पी. पी. खंडाईत, कृषी सहायक आर. डी. रामटेके, आत्माचे उमेश सोनेवाने, अरविंद उपवंशी उपस्थित होते.