रबी पिकांना फटका : चांदोरी खुर्द परिसरात १०० हेक्टर धान धोक्यातपरसवाडा : चांदोरी खुर्द, पिपरिया, सावरा, अर्जुनी, परसवाडा, बोरा, बाघोली, बिहीरीया या गावात दोन वर्षापासून उन्हाळी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र यावर्षी वैनगंगेच्या पात्रात पुरेसे पाणी नसल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीत सावरापर्यंत स्थिर असते. त्यामुळे या गावात वैनगंगेच्या पाण्यामुळे विद्युत पंपाद्वारे पाण्याचा उपसा करून उन्हाळी धानाची लागवड केली जाते. पण यावर्षी मार्च अखेरपासूनच वैनगंगेत पाणी कमी होऊ लागले. संपूर्ण तीन किमीचा चांदोरी खुर्द ते सावरापर्यंत पाणी खाली गेल्याने नदीपात्राचे वाळवंट झाले आहे. पाणी १५ ते २० फुट खोल होते. त्या ठिकाणी पांढरी रेतीच दिसते. विद्युत पंप कोरडे पडले आहे. धान पीक वाळू लागले आहे. पीक वाळू नये म्हणून शेतकऱ्यांनी मध्यठिकाणी पाणी साठविले आहे. त्या ठिकाणाहून जेसीपी कालवा काढून विद्युत पंपाजवळ काठावर खड्डा खोदून पाणी आणने सुरू आहे. प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी उपयोगात येत नाही. त्यामुळे या आठ गावातील रब्बी पिक धोक्यात आले आहे. कर्ज काढून धान लावले तेही गेले तर आत्महत्याशिवाय पर्याय नाही, असे शेतकरी बोलतात. पाणी वैनगंगेत अडल्याने काही प्रमाणात विहीरी-बोर भरल्या होत्या. पाणी खाली गेल्याने संपूर्ण विहीरी-बोर आटल्या. एप्रिल महिन्यात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. आणखी धान पिक निघण्यासाठी एक महिनाचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
वैनगंगा नदीचे झाले वाळवंट !
By admin | Published: April 17, 2016 1:32 AM