गोरेगाव (गोंदिया) : तालुक्यातील कुऱ्हाडी येथे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही एक दिव्यांग कुटुंब सध्या हलाखीचे जीवन जगत आहे. हाताला काम नाही, त्यात घरातील सर्वच दिव्यांग असताना पोटपाण्याचा सतावणारा प्रश्न रोजचाच आहे. दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी तळागाळातल्या दिव्यांगांना त्या सवलती मिळतात का? हा खरा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
कुऱ्हाडी येथील वास्तव्यात असलेले राजेश टेंभुर्णीकर, पत्नी रंजना राजेश टेंभुर्णीकर, मुलगी डिंपल राजेश टेंभुर्णीकर, खुशबू राजेश टेंभुर्णीकर या चौघांपैकी आई-वडील आणि बहीण हे तिघेही दिव्यांग आहेत. घरात अठरा विश्वे दारिद्र्य, या दारिद्र्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना आता खरा प्रश्न निर्माण झाला आहे तो डिंपल या सातव्या वर्गाच्या मुलीचा.
डिंपल अल्पदृष्टी ४० टक्के दिव्यांग आहे. डिंपलच्या डोळ्यात दोष असून त्याकरिता शस्त्रक्रियेचा सल्ला केटीएस येथील मुख्य नेत्रचिकित्सक यांनी नागपूर मेडिकल येथे जाण्याचा सल्ला दिला. मात्र जाण्या-येण्याचा भार कुटुंबाला झेपणारा नाही. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून टेंभुर्णीकर कुटुंबीय नागपूरला जाऊ शकले नाही. शस्त्रक्रियेचा खर्च सोडा जाण्यासाठीही या कुटुंबीयाकडे पैसा नाही. त्यामुळे नागपूरला जावे कसा असा प्रश्न या कुटुंबाला भेडसावत आहे.
टेंभुर्णीकरांच्या या एकाच कुटुंबात तीन दिव्यांग आहेत. दिव्यांग मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सामाजिक बांधीलकी जपत दानदात्यांनी सामाजिक सढळ हाताने पुढे येण्याची गरज पुढे येण्याची गरज आहे. दीड एकर शेती आणि मोलमजुरी काबाडकष्ट करून कुटुंबाचा गाडा पुढे रेटत असताना दृष्टिदोष असणाऱ्या दिव्यांग डिंपलच्या शस्त्रक्रियेसाठी दानवीर पुढे येतील का हा खरा प्रश्न आहे.
कुटुंबाला आधाराची गरज
कुऱ्हाडी ही शहिदांची भूमी, शहीद जाम्या तिम्या या शहीद झालेल्या दोन भावंडांमुळे कुऱ्हाडीची भूमी पावन आहे. साऱ्या महाराष्ट्रात कुऱ्हाडी गावाचा नावलौकिक आहे. याच गावातील टेंभुर्णीकर कुटुंबाला आधाराची गरज आहे.
आईवडिलांना सतावतेय मुलीच्या उपचाराची चिंता
कोरोनासारख्या महामारीशी दोन हात करून संघर्ष करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत असताना, मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाला दिव्यांग राजेशने सांभाळले. परंतु नागपूर येथे जाऊन उपचार करणे इतपत राजेशची आर्थिक परिस्थिती नसल्याने सध्या कुटुंबीय चिंतेत आहे. अतिशय मन हेलावणारी विदारक परिस्थिती सध्या टेंभुर्णीकर कुटुंबाची आहे. टेंभुर्णीकर कुटुंबात आई मतिमंद, वडील पोलिओ दिव्यांग तर सातव्या वर्गात शिकणारी डिपल अल्पदृष्टी दिव्यांग आहे.
खरे दिव्यांग मदतीपासून दूरच
दिव्यांगांना मिळणाऱ्या शासनाच्या बऱ्याच सवलती कागदावरच आहेत. अनेक बोगस दिव्यांग जिल्ह्यात हुशारीने शासनाच्या सवलती घेतात. मात्र खऱ्या दिव्यांगाची नेहमी हेळसांड होताना दिसते. गोंदियासारख्या प्रगत जिल्ह्यात दृष्टिदोष असणाऱ्या दिव्यांगाची शस्त्रक्रिया होत नाही. त्यासाठी येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी नागपूर येथे गरीब दिव्यांगांना रेफर करून स्वतःच्या कर्तृत्वाचा पाढा वाचतात. तेव्हा कळते गोंदिया जिल्हा किती मागासलेलला जिल्हा आहे.