सडक अर्जुनी : ज्याचा कोणी नाही, त्याचा देव असतो, अशी म्हण आहे, पण हे देवपण माणसातच असते. निराधार असलेल्या आजीच्या मदतीला एक देवमाणूस धावून आला. त्यामुळे निराधार आजीला आधार मिळाल्याचा प्रत्यय आल्याची घटना तालुक्यातील डव्वा येथील बँकेत घडली.
तालुक्यातील कोहळीटोला चिरचाडी येथील कमलाबाई परिहार (६८) यांना निराधार योजनेतून एक हजार रुपये दर महिना मिळताे. ते पैसे डव्वा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात जमा होतात. कमलाबाई यांच्या सासऱ्यांने काही वर्षांपूर्वी कर्ज काढला होते. गरीब परिस्थितीमुळे ते पैसे भरू शकले नाही. सासऱ्यांचे कर्ज थकीत झाल्यामुळे निराधार आजीचे पैसे बँक व्यवस्थापक विड्रॉल करू देत नव्हते. तू आपल्या सासऱ्याचे कर्ज भर, तुझे निराधार योजनेचे पैसे देतो, अशी भूमिका बँक व्यवस्थापकाने घेतली होती, पण निराधार योजनेचे पैसे कुठेही वळता करता येत नाही, हे विशेष! मागील दीड वर्षांपासून कमलबाई निराधार योजनेचे पैसे मिळावे, म्हणून बँकेच्या पायऱ्या झिजवित होती. त्या आजीला एक सज्जन गृहस्थ एफआरटी शहा यांच्या रूपात देवमाणूस मिळाला. त्यांना कमलाबाईने आपली आपबिती सांगितली. तिला मदत म्हणून शहा हे प्रत्यक्ष बँक व्यवस्थापक भाटघरे यांना भेटून पैसे देण्यासाठी विनंती केली, पण व्यवस्थापक काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे शहा यांनी यांनी प्रादेशिक व्यवस्थापकांशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर, लगेच दुसऱ्या दिवशी कमलबाई यांना निराधार योजनेचे पैसे मिळाले. कमलाबाईने एफआरटी शहा यांचे आभार मानले.