साखरीटोला : गावातील मध्यभागी असलेल्या प्रोग्रेसिव्ह गार्डनचा विकास करण्यात यावा, यासाठी प्रोग्रेसिव्ह युवा संघटनेच्या वतीने सरपंच नरेश कावरे, उपसरपंच अफरोज पठाण व सदस्य वसंत साखरे, श्वेता अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले.
प्रोग्रेसिव्ह गार्डन प्रमुख चौकात आहे व याच प्रोग्रेसिव्ह गार्डनमध्ये पाॅवर जिमसुद्धा आहे. आधी येथे घाणीचे साम्राज्य होते व विविध प्रकारचे डिस्पोजल व बॉटल्स पडल्या असायच्या; पण प्रोग्रेसिव्ह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समोर येऊन स्वच्छता व झाडांची लागवड करून या गार्डनला एक नवीन रूप दिले. आता गावकऱ्यांना या गार्डनमध्ये बसता यावे, यासाठी येथे बसण्यासाठी खुर्च्यांची व रात्री सोयीस्कर व्हावे म्हणून लाइटची व्यवस्था करून देण्याची मागणी संघटनेने केली आहे. तसेच वारंवार गार्डन परिसरात अतिक्रमण करण्याचे प्रयत्न केले जात असतात, हा मुद्दा लक्षात घेऊन काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे व याचे निवारण केले जावे, यासाठी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात अध्यक्ष रजत दोनोडे, उपाध्यक्ष शुभम बावनथडे, सचिव अंकित मिश्रा, तुषार शेंडे, विकी दाते, संतोष तावाडे, साहिल दोनोडे, अभिषेक सोनवाने, अरफाज शेख व इतर उपस्थित होते.