गोंदिया : शहरात असून आजही ग्रामीण भागाच्या स्थितीत असलेल्या छोट्या गोंदिया परिसराचा विकास करण्यात यावा या मागणीसाठी येथील जनशक्ती संघटनेच्या वतीने शनिवारी (दि.२६) परिसरातील नागरिकांना घेऊन आमदार विनोद अग्रवाल यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी छोटा गोंदिया परिसरात पोलीस चौकी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, सामुदायिक समाजभवन बांधकाम, शासकीय सार्वजनिक वाचनालय, व्यायामशाळा शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली. यावर आमदार अग्रवाल यांनी, पोलीस चौकीसाठी गृहमंत्री, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी आरोग्य मंत्री व जिल्ह्याचा आरोग्य विभाग यांच्याकडे पत्र पाठवून मंजुरीसाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. तर परिसरात पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दूरध्वनीवरून दिले. तसेच चावडी चौक परिसरात उपलब्ध शासकीय जागेवर सामुदायिक समाजभवन बांधकामासाठी आपल्या आमदार निधीतून एक कोटी मंजूर करीत असल्याचे सांगितले. तर तेथेच सार्वजनिक वाचनालयासाठी खोलीचे बांधकाम करून वाचनालयासाठी स्वतःकडून साहित्य व पुस्तके देण्यात येईल असे सांगितले. तसेच परिसरात व्यायामशाळेसाठीही निधी देण्यास मंजुरी दिली. याशिवाय नगर परिषदेकडून घरकूल मंजुरी, गरजू लाभार्थ्यांना रेशनसाठी येत असलेल्या अडचणी, भूमिगत गटार योजनेंतर्गत केलेल्या खोदकाम व शारदा चौक ते राधाकृष्ण चौकापर्यंतच्या फुटलेल्या व जर्जर झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल चर्चा करण्यात आली. जनशक्ती संघटनेचे संयोजक तीर्थराज उके, अध्यक्ष मयूर मेश्राम, उपाध्यक्ष राजेश मेश्राम, उपाध्यक्ष रमेश सोनवाने, सचिव अनिल शरणागत, कोषाध्यक्ष कैलाश शेंडे, संघटक ताकेश पहिरे, सुर्यभान मेश्राम, संघटक देवेंद्र शेंडे, उमेश भांडारकर, सहसचिव आशिष उईके, सहकोषाध्यक्ष डेईराम ठाकरे, प्रसिद्धी प्रमुख रोशन पाचे, सदस्य मोहम्मद अंसारी, अनिल ढोमने, मोहम्मद अंसारी, संतोष सहारे, अशोक बिसेन, भूषण गौतम, सुरेश ओझा, रमेश बागडे, रमेश सोनुले, श्रीराम फरकुंडे, उमेश ठाकरे, राजेश कटरे यांचा सहभाग होता.