गोंदिया : येत्या २५ तारखेपासून हिंदी भाषिकांच्या श्रावणाला सुरुवात होत असून, २६ तारखेला त्यांचा पहिला श्रावण सोमवार येत आहे, तर ९ ऑगस्टपासून मराठी भाषिकांच्या श्रावणाला सुरुवात होत आहे. श्रावणमासात महादेवाची पूजा केली जात असून, महादेवाचे भक्त या काळात महादेवाला नदीच्या पवित्र जलाने अभिषेक घालतात. यासाठीच श्रावण मासात कावड यात्रांचे आयोजन केले जाते व त्यात पुरुषांच्या बरोबरीनेच महिलाही भाग घेतला. मात्र आता कोरोनामुळे या सर्व आनंदावर मागील वर्षापासून विरजण पडले आहे. कोरोनामुळे मागील वर्षीही सर्वच मंदिरे बंद होती. तर तोच प्रकार यंदाही घडला असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता मंदिर पुन्हा बंद करण्यात आले आहे. यामुळे येत्या श्रावणाला घेऊन भाविकांचे मन कासाविस होऊ लागले आहे. महादेवाला श्रावणात अभिषेक घालण्याचे महापुण्य मानले जात असून, मंदिर बंद असल्यामुळे यंदाही महादेवाच्या अभिषेकाची आस पूर्ण होते का नाही, या विवंचनेत भाविक आहेत. श्रावण मासात तरी मंदिर उघडण्यात यावे, अशी त्यांची आर्त हाक आहे.
--------------------------
१) श्रावण सोमवार
पहिला - २६ जुलै
दुसरा - २ ऑगस्ट
तिसरा - ९ ऑगस्ट
चौथा - १६ ऑगस्ट
--------------------------------
हार-फुलवाल्यांचीही होते कमाई
श्रावणात महादेवाला बेलाची पाने व धोतऱ्याचे फळ चढविण्याची प्रथा असून, या त्यांच्या प्रिय वस्तू असल्याचे मानले जात असून, त्यांचाच मान आहे. आता बेलाची पाने व धोतऱ्याचे फळ कुणी शोधत नसून, मंदिर परिसरात हार-फूल विकणारे जाणून ते श्रावण मासात आणून विकतात. प्रत्येक भाविक महादेवाच्या दर्शनाला आला की महादेवाला बेलाची व धोतऱ्याचे फळ त्यांच्याकडून खरेदी करून चढवितात. शिवाय प्रसादासाठी काही पदार्थ व नारळ असतेच. यामुळेच या हार-फुलवाल्यांचीही श्रावणमासात चांगलीच कमाई होते.
-------------------------------------
व्यवसायिक प्रतिक्रिया
श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी येणारे भाविक बेलाची पाने व धोतऱ्याचे फळ खरेदी करतात. शिवाय पूजेसाठी लागणारे अन्य साहित्यही त्यांना लागत असल्याने आम्ही आपल्या दुकानात आणून ठेवतो. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यात आता श्रावणातही मंदिर बंद राहिल्यास आमचे आणखीच नुकसान होणार आहे.
- हर्षू कावळे
----------------------------
कोरोनामुळे मागीलवर्षीही मंदिर बंद होते व तेव्हा आम्हाला चांगलाच फटका बसला. आता दुसऱ्या लाटेचे परिणाम आताही भोगावे लागत असून, मंदिर बंद असल्याने आमचा व्यवसाय अडचणीतच आहे. त्यात आता श्रावणमासाला प्रारंभ होत असूनही मंदिर बंद आहे. आता मंदिर उघडल्यास महादेवाच्या पूजेसाठी लागणाऱ्या सामानामुळे आमच्या हाती काही लागणार आहे.
- दयाराम बांते