गोंदिया : बिरसी विमानतळावरील पायलट प्रशिक्षण देणाऱ्या राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्राच्या विमानाला अपघात झाल्याने प्रशिक्षकासोबतच प्रशिक्षणार्थींचा शनिवारी (दि. १८) मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सोमवारी (दि.२०) डायरेक्टर जनरल ऑफ़ सिव्हील एव्हिएशन (डीजीसीए) व एयरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआईबी) ची चमू बालाघाट जिल्ह्यातील भक्कुटोला जंगलातील कोसम परिसरातील टेकडीवर पोहचली. ही चमू तीन दिवस या ठिकाणी तपास करणार असल्याची माहिती आहे.
मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कोसम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भक्कुटोला जंगलातील टेकडीवर हा अपघात झाला होता. त्या ठिकाणी सोमवारी डीजीसीए व एएआईबीची चमू दाखल झाली. यासाठी दोन दोन सदस्यांची चमू गठीत केली असून घटनास्थळी विविध बाजूने तपास करत आहेत. या चमूने घटनास्थळावरून अपघातग्रस्त विमानाचे अवशेष तसेच ब्लॅक बाॅक्सचा शोध सुरू केल्याची माहिती आहे. ही चमू या ठिकाणी तीन दिवस तपास करणार असून त्यानंतर ती आपला अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार आहे.
वृशिंकाच्या कुटुंबीयांचा आरोप
राष्ट्रीय उड्डाण अकादमीच्या तांत्रिक त्रुटींमुळे हा अपघात झाला आणि त्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप वृशिंकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे पायलट प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या विमाने सुस्थितीत आहे किंवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
आजपासून सुरू होणार प्रशिक्षण
बिरसी विमानतळावरील पायलट प्रशिक्षण देणाऱ्या राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्राच्या विमानाला अपघात झाल्याने प्रशिक्षकासोबतच प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बिरसी विमानतळावरून प्रशिक्षित पायलटनी उड्डाण घेणे बंद केले होते. मात्र, २१ मार्चपासून नियमित उड्डाण प्रशिक्षण सुरू होणार असल्याचे संचालक कृष्णेंदू गुप्ता यांनी सांगितले.