लोहारा : ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे सकाळी-सकाळी कचरा उचलणाऱ्या वाहनांवर लागलेल्या स्पीकरमध्ये ऐकायला मिळते. हे गाणे शहरात इतके लोकप्रिय झाले आहे की, छोट्या मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच गुणगुणायला लागले आहेत.
देवरी शहरात कचऱ्याच्या गाडीत पहाटे-पहाटे स्पीकरवर हे गाणे वाजू लागताच शहरातील महिला व लहान मुले घरातील ओला-सुका कचरा गाडीत आणून टाकतात. काहीच वेळात हे गाणे देवरी शहरात खूप प्रसिद्ध झाले आहे. या गाण्याची खास गोष्ट अशी की, शहरातील अनेक लहान मुलांना बऱ्याच वेळा हे गाणे गाताना बघता येते. देवरी शहरातील वॉर्डांमध्ये हे गाणे अविरत सर्वांनाच सकाळच्या सुमारास ऐकायला मिळते. कचरागाडी आली की अनेक जण बाहेर निघून कचरा फेकायला तत्पर असतात. देवरी नगरपंचायतला ४ नवीन कचरागाड्या शहरातील कचरा संकलनासाठी मिळाल्या असून प्रत्येक प्रभागातील प्रत्येक घरी जाऊन ओला-सुका कचरा संकलनाचे काम त्याव्दारे केले जात आहे.