गोंदिया : खाद्यपदार्थांत भेसळ करून पदार्थ विक्री केले जात आहे. अधिक पैसा कमविण्याच्या नादात शुद्ध पदार्थात भेसळ करून त्यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ ग्राहकांना अव्वाच्या सव्वा भावात विक्री केले जातात. हे पदार्थ सेवन केल्यास जणू आपण आपल्या शरीरात हळूहळू विष घेत आहोत. जिल्ह्यात २००० पेक्षा अधिक हॉटेल व मिष्ठान्न दुकाने आहेत. काही दुकानांत शुद्ध पदार्थ देऊन चांगली मिळकत मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. परंतु, काही दुकानांत भेसळ केलेल्या पदार्थांची विक्री होते. सामान्य वेळी भेसळ कमी असते. परंतु सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात भेसळ वाढते. या भेसळखोरांवर अन्न व औषध विभागाची नजरही असते. परंतु त्यांच्या नजरेआड भेसळखोर आपला डाव साधून घेतात. गोंदिया जिल्ह्यात सन २०२० मध्ये ६० नमुने तर सन २०२१ च्या सात महिन्यांत ३८ असे एकूण ९८ नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न निरीक्षकांनी घेतले. यापैकी ३८ नमुने प्रमाणित आढळले. १२ नमुने अप्रमाणित, २९ नमुने असुरक्षित, एक नमुना मिथ्याछाप आढळला. १८ नमुन्यांचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला नाही.
............................
खरेदी करताना घ्या काळजी
भेसळ केलेले पदार्थ खरेदी करून त्याचे सेवन केल्यास ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात. शरीराला स्लो पाॅयझन ठरणाऱ्या पदार्थांची खरेदी करताना भेसळयुक्त पदार्थ आपण खरेदी तर करीत नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक पदार्थाच्या ट्रे समोर बेस्ट बीफोर लिहिले आहे किंवा नाही, याचीसुद्धा तपासणी करणे आवश्यक आहे.
...................
सणासुदीत अधिक भेसळ
सणासुदीच्या काळात मिष्ठान्न व इतर खाद्यपदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी राहत असल्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात भेसळ वाढते. या भेसळखोरांवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन प्रयत्न करते. परंतु, त्यांच्याकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे सगळ्यांपर्यंत पोहोचता येत नाही.
.......................
कोरोनाकाळात ४२ टक्के नमुन्यांतील भेसळ
कोरोनाकाळात ९८ नमुने घेण्यात आले. यापैकी ३८ नमुने प्रमाणित आढळले. १२ नमुने अप्रमाणित, २९ नमुने असुरक्षित, एक नमुना मिथ्याछाप आढळला. तर, १८ नमुन्यांचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला नाही. ४२ टक्के नमुने भेसळयुक्त असल्याचे पुढे आले आहे.
.................
भेसळ किती?
कधी------------घेतलेले नमुने-------------भेसळ
२०२०----------------६०---------------------- २७
जानेवारी-----------०९---------------------- ०२
फेब्रुवारी------------०२---------------------- ००
मार्च----------------१३---------------------- ०८
एप्रिल---------------०६---------------------- ०५
मे--------------------०१---------------------- ००
जून-------------------०३---------------------- ००
जुलै-------------------०४---------------------- ००
ऑगस्ट---------------००---------------------- ००
.................
नियमित तपासणी सुरूच असते. भेसळ होत असल्याचा संशय आला किंवा कुणाच्या तक्रारी आल्या, तर आम्ही नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवितो. नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर भेसळ असल्यास त्या प्रतिष्ठानांवर कारवाई केली जाते.
- शीतल देशपांडे
अन्न निरीक्षक गोंदिया