पालिकेवर थकबाकी : पर्यायी व्यवस्था केली गोंदिया : सुमारे पाच लाख रूपयांची थकबाकी होऊन नियमित पैसे मिळत नसल्याने येथील नाईस पेट्रोल पंप संचालकांनी नगर परिषदेच्या गाड्यांना डिझेल देणे बंद केले. शनिवारपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे नगर परिषदेच्या गाड्या तशाच उभ्या होत्या. यावर मात्र पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याने मंगळवारपासून पूर्ववत गाड्या सुरू झाल्या. नगर परिषदेच्या विविध विभागांकडे विविध प्रकारच्या गाड्या आहेत. या सर्व वाहनांत पेट्रोल-डिजेलसाठी येथील नाईस पेट्रोल पंपकडे नगर परिषदेचे खाते आहे. त्यानुसार सर्व गाड्यांमध्ये तेथूनच पेट्रोल-डिजेल भरविले जाते. नगर परिषदेकडून त्यांना जमेल तसे पैसे दिले जातात. आजघडीला नगर परिषदेवर त्यांचे सुमारे पाच लाख रूपये अडून पडले आहेत. यावर नाईस पेट्रोल पंपचे संचालक पुरूषोत्तम मोदी यांनी नगर परिषदेच्या वाहनांना डिजेल देण्यास मनाही केली. प्राप्त माहितीनुसार, शनिवारपासून नगर परिषदेच्या वाहनांत डिजेल टाकण्यास मनाही करण्यात आली. त्यामुळे पालिकेच्या वाहनांना उभे ठेवण्यात आले होते. पेट्रोल पंप संचालकांच्या या भुमिकेमुळे नगर परिषदेच्या सर्वच वाहनांवर ही गाज पडली होती. (शहर प्रतिनिधी) अध्यक्षांच्या मध्यस्थीने पर्यायी व्यवस्था वाहनांत डिजेल नसल्याचा फटका सर्वाधिक स्वच्छता विभागावर पडला. या विभागातील वाहने अकडून पडल्याने शहरातील सफाईचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब गांभीर्याने घेत नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी बम्लेश्वरी पेट्रोल पंपवरून डिजेल उपलब्ध करवून दिले. त्यामुळे मंगळवारपासून पुन्हा नगर परिषदेची वाहन सेवा पूर्ववत सुरू झाली.
पालिकेच्या वाहनांना डिझेल बंदी
By admin | Published: August 10, 2016 12:19 AM