मागील तीन चार महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असून एसटी महामंडळाला सुध्दा थोडी संजीवनी मिळाली आहे. गोंदिया आगारातून सध्या दररोज ३७५ बस फेऱ्या होत आहे. यासाठी दररोज ५५०० लिटर डिझेल लागते. पण मागील तीन महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने दरवाढ केली जात आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून महागाईत वाढ झाली आहे. तर एसटी महामंडळाला सुध्दा चटके बसत आहे. डिझेलच्या किमतीमध्ये जवळपास ७ रुपयांची वाढ झाली असल्याने आगाराला महिन्याकाठी ९ लाख रुपयांचा फटका बसत आहे. कोरोनामुळे आधीच महामंडळाचे चाक खोलात रुतले असून मालमत्ता विक्री करुन कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची पाळी आली होती. त्यातून कसेबसे सावरत असताना आता डिझेलच्या दरवाढीचा फटका बसत आहे. बसेसची होणारी झिज, मेटन्सं, कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि इतर खर्चाचा ताळमेळ जोडताना आगारांची फारच दमछाक होत आहे.
......
कोरोनामुळे आगाराला ७ कोटी ८७ लाखांचा तोटा
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे एसटी प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे या कालावधीत गोंदिया आगाराला ७ कोटी ८७ लाख रुपयांचा तोटा झाला. तर मागील वर्षी जानेवारी महिन्यापर्यंत गोंदिया आगार ९६ लाख रुपयांने नफ्यात होते.
.......
प्रवाशी संख्येत पुन्हा घट
मागील आठ ते दहा दिवसांपासून विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. त्यामुळे एसटीच्या लांब पल्ल्याच्या आठ ते दहा बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आगाराच्या एकूण बस फेऱ्यातून ८ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. ते आता ६ लाख रुपयांवर आले आहे.
.....
खर्चात वाढ मात्र उत्पन्न घटले
कोरोनामुळे प्रवाशांच्या संख्येत पुन्हा घट झाली आहे. सध्या स्थितीत ३७५ बस फेऱ्या होत आहेत. तर पूर्वी ही संख्या ५०० च्या जवळपास होती. मात्र आता प्रवाशी घटले, काही मार्गावर बस चालवून प्रवाशी नसल्याने बरेचदा डिझेलचा खर्च सुध्दा भरुन निघत नाही. त्यात बसेस सॅनिटायझेशन करण्याच्या खर्चात वाढ झाली असल्याचे आगाराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.