मुख्यमंत्र्याकडे तक्रार : गणखैरा व तुमखेडा येथील कालवा प्रकरण गोरेगाव : कटंगी मध्यम प्रकल्पाचे पाणी वितरण करण्यासाठी निघालेला कालवा गणखैरा व तुमखेडा शेत जमिनीतून जात आहे. यासाठी भूसंपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात शासनाने वेगवेगळे निकष लावले आहे. त्यामुळे २००६ ते २००७ या कालावधीत भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला एकरी ३ लाख रुपये तर २०१५ या कालावधीत संपादीत झालेल्या जमीन मोबदला ८ लाख रुपये देण्यात आला. यासंदर्भात शासनाची एवढी मोठी तफावत कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. याची तक्रार मुख्यमंत्र्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या २००६ ते २००७ या काळात ज्या जमिनी शासनाने संपादीत केल्या होत्या. त्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना सरसकट देण्यात आला. मात्र २०१५ ते २०१६ या वर्षात देण्यात आलेल्या मोबदल्यात बाजारमूल्य, अधिसूचना गुणकानुसार, असेन्टचा मोबदला, दिलासा रक्कम १०० टक्के, २५ टक्के सरळ खरेदी संमतीचे अनुदान इत्यादी बाबीचा विचार करीत मोबदला देण्यात आला. गणखैरा ते मिलटोली मार्गाच्या डाव्या हातावरच्या शेतकऱ्यांना नवीन मुल्यांकनानुसार मोबदला उजव्या बाजूच्या शेतकऱ्यांना मात्र जुन्या मुल्यांकनानुसार मोबदला देण्यात आला. ही तफावतच शेतकऱ्यांच्या पचनी पडत नाही. आम्हाला शासनाच्या नव्या धोरणानुसार वाढीव रक्कम का देण्यात येवू नये असा सवाल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. भूमी अधिग्रहण कायदा १९८४ नुसार शेतकऱ्यांना वर्तमान किमतीच्या आधारे ग्रामीण भागाला किमतीेच्या चार पट ऐवढा मोबदला शासनाने द्यायला हवा. पण शासनाने तसे केले नाही. (तालुका प्रतिनिधी)
शेतजमिनीच्या मोबदल्यात वेगवेगळे निकष?
By admin | Published: February 09, 2017 1:10 AM