लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी काही टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे लागणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी यंदा मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचे संकेत सिंचन विभागाने दिले आहे. त्यामुळे खरीपा पाठोपाठ रब्बी हंगाम सुध्दा संकटात आला आहे.खरीप हंगामानंतर जिल्ह्यातील शेतकरी रब्बी पिकांची लागवड करतात. दरवर्षी जवळपास ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात तब्बल १० हजार हेक्टरने घट झाल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने देखील यंदा २५ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड होण्याचे नियोजन केले आहे. रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन हे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर अवलंबून असते.त्यामुळे त्याचाच अंदाज घेत शेतकरी पिकांची लागवड करतात. रब्बीसाठी बाघ व इटियाडोह, पुजारीटोला, कालीसरार प्रकल्पाचे पाणी दिले जाते. मात्र सध्या स्थितीत या प्रकल्पांमध्ये ५० ते ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर यंदा परतीचा पाऊस सुध्दा न बरसल्याने रब्बी हंगामातील धानासह कठाण पिकांना सुध्दा फटका बसण्याची शक्यता आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस व किडरोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.परिणामी धानाच्या हेक्टरी सरासरी उत्पादनात सुध्दा आठ ते दहा क्विंटलने घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढून अशी आशा शेतकऱ्यांना होती.मात्र सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने सिंचन विभागाने रब्बी हंगामासाठी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामाला सुद्धा मुकावे लागणार आहे.रब्बी हंगामात नहरांची दुरूस्तीसिंचन विभागाने यंदा ऐन रब्बी हंगामात नहराच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे रब्बीसाठी शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची आशा पूर्णपणे धुरसर झाली आहे. तर सिंचन विभागाने नेमके रब्बी हंगामा दरम्यानच नहर दुरूस्तीच्या कामाचे नियोजन का केले असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.पाणीटंचाईची शक्यतासिंचन प्रकल्पांमध्ये सध्या स्थितीत मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भूजल पातळीत घट झाली असून उन्हाळ्यात जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
रब्बी हंगामासाठी पाणी मिळणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:47 AM
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी काही टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे लागणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी यंदा मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचे संकेत सिंचन विभागाने दिले आहे.
ठळक मुद्देसिंचन विभागाचे संकेत : शेतकरी संकटात