गोंदिया : देशभरात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेली लसीकरण मोहीम जिल्ह्यातही धडाक्यात सुरू करण्यात आली. याला सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांसह ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांना टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू करण्यात आले, परंतु लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचे व लसीकरण केंद्रासंदर्भात आवश्यक ती माहिती नागरिकांना मिळत नसल्याने कुठल्या केंद्रावर कुठली लस मिळणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांना या केंद्रावरून त्या केंद्रावर हेलपाटे मारावे लागतात.
लसीकरण केंद्रावर पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाकरिता कोव्हॅक्सिन तर दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाकरिता कोविशिल्ड ही लस देण्यात येते. मात्र, लसीकरण केंद्रामध्ये कुठल्या लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिन मिळणार व कुठल्या लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड मिळणार याबाबत योग्य ती माहिती नसल्याने नागरिकांना लसीअभावी बऱ्याच केंद्रावरून परतावे लागते. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणासंदर्भात नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे मात्र लसीकरण केंद्रावर आवश्यक ते नियोजन आणि अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने यात विशेष लक्ष घालून संभ्रम दूर करणे गरजेचे आहे.