गोंदिया : शहरातील मुर्री रोडवरील नाल्यावर दीड वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र नाल्याच्या बांधकामाकरिता जवळील रस्ता खोदण्यात आला होता. परंतु त्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचेही बांधकाम करणे गरजेचे होते. परंतु कंत्राटदाराने रस्त्याचे काम केले नाही. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. नागरिक पुलावरून न जाता वळण मार्गाने जाणे पसंत करीत आहेत.
शहरातील मुख्य मार्गापैकी मुर्री रोड हा एक मार्ग आहे. या मार्गावरील अंबिका दूध डेअरीजवळील नाल्यावरील पुलाची दुरवस्था झाली होती. मात्र मागीलवर्षी या नाल्यावर पुलाची निर्मिती करण्यात आली. या पुलाच्या निर्मितीसाठी कंत्राटदाराने सात ते आठ महिने लावले. त्यामुळे नागरिकांत रोष आहे. मात्र, कंत्राटदार व संबंधित अभियंत्यांनी पुलाची निर्मिती तर केली; मात्र पुलाच्या कामाकरिता खोदलेल्या रस्त्याची योग्यरितीने दुरुस्ती केली नसून, त्यांनी केवळ मलमा व माती टाकूनच मोकळे होण्यास धन्यता मानली. दरम्यान, नागरिकांना या पुलाजवळील उखडलेल्या रस्त्यावरून ये-जा करण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून जड वाहनांसह दैनंदिन कामाकरिता या मार्गावरून हजारो नागरिक ये-जा करतात. दररोज दुचाकी, चारचाकी आणि जड वाहने तसेच सायकलने शहरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय, बँक, शासकीय कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी दररोज ये-जा करतात. मुर्री येथे भारतीय, खाद्यात्र महामंडळाचे गोदाम असल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहत असून, शेकडो जड वाहनांची ये-जा सुरूच असते. तसेच चुटिया, मुर्री, संजयनगर, पांगडी, श्रीनगर आदी परिसरातील नागरिक याच रस्त्यावरून ये-जा करतात. मागील वर्षभरापासून पुलाजवळील रस्त्यावरून ये-जा करण्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बॉक्स
नाल्यावरील पूल ३२ लाखांचा
शहरातील मुर्री रोडवरील अंबिका दूध डेअरीसमोरील नाल्यावरील पुलाचे बांधकाम कासवगतीने करण्यात आले होते. या पुलाच्या बांधकामाकरिता ३२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. कंत्राटदाराने त्या खोदलेल्या दोन्ही बाजूच्या रस्त्याची सिमेंट, काँक्रिट टाकून दुरुस्ती केली नाही. त्या कंत्राटदाराने केवळ माती व मलबा टाकूनच मोकळा झाला. दरम्यान, जड वाहने रस्त्यावरून गेले असता, माती व मलबा खाली गेल्यामुळे खड्डे तयार झाले असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.