लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : हल्ली खासगी शाळेचे बाजारीकरण झाले असताना तालुक्यात प्रथम क्रमांकावर असणाऱ्या ग्राम भागी येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेत पटसंख्या जास्त असून वर्ग खोल्या कमी आहेत. यामुळे मुलांना शिक्षण द्यायचे कसे? असा प्रश्न येथील शिक्षक व पालकांना पडला आहे. यातूनच आता भाड्याच्या घरात वर्ग घेण्याची पाळी आली आहे. यावर शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तत्काळ दोन वर्गखोल्यांची मागणी केली आहे.‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ असा संदेश देऊन प्रशासन जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढविण्याकरिता प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील ग्राम भागी येथील नामांकित प्राथमिक शाळा व तेथील शिक्षक यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहेत. परंतु वर्गखोल्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे, हा प्रश्न शिक्षकांसमोर पडला आहे. सध्या या शाळेत वर्ग १ ते ५ मध्ये एकूण १८२ विद्यार्थी शिक्षण घेत असून प्रत्यक्ष वर्ग अध्यापनाकरिता ४ वर्ग खोल्या उपलब्ध आहेत. यापैकी दोन वर्ग खोल्या मोठ्या दुरुस्तीची प्रतीक्षा करीत आहेत.सध्या इयत्ता तिसरीचा वर्ग शाळेशेजारील भाड्याच्या घरात घेतला जात आहे. तरी प्रत्यक्ष अध्यापनाकरिता दोन वर्गखोल्या कमी पडत आहेत. २६ मार्च रोजी शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन दोन वर्गखोल्यांकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी गोंदिया यांच्याकडे प्रस्ताव सादर करून तत्काळ दोन वर्ग खोल्यांची मागणी केली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन वर्गखोल्या द्याव्यात अशी मागणी पालकांनीसुद्धा केली आहे. याकडे प्रशासन किती गंभीरतेने लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शाळेच्या स्टेजवर भरतो एक वर्ग- बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र अमृतकर तसेच त्यांचे शिक्षक सुमीत चौधरी व अमोल खंडाईत यांनी फार मेहनत घेऊन शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविला. पटसंख्येच्या बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक या शाळेने मागील वर्षी पटकाविला. शाळेतील जास्त पटसंख्या व वर्गखोल्या कमी बघता शासनाने दोन वर्षांअगोदर एक वर्गखोली दिली होती. त्यातच शाळेच्या स्टेजवर पालकांच्या सहयोगातून पत्रे व टाईल्स लावण्यात आली. आज त्या स्टेजवर एक वर्ग लागत आहे. शाळेचा नावलौकिक बघता येणाऱ्या सत्रातही शाळेतील पटसंख्या वाढणार हे लक्षात शासनाने या शाळेकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.