संवाद शिवार यात्रा : आमदारांनी साधला कृषीविषयक बाबींवर संवादलोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : आ. विजय रहांगडाले यांनी शुक्रवारी गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जलयुक्त शिवार, शेतीसंबंधी कृषी निविष्ठा व दर्जेदार बी-बियाण्यांचा वापर पुरविणे, कृषी कर्ज व पीक विमा आदी विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला. भाजप सरकारने ‘शाश्वत शेती-समृध्द शेतकरी’ तसेच बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी योग्य पाऊल उचलले आहे. यासोबतच विविध विषयांवर चर्चा करीत गावाच्या समस्या निकाली काढून गाव विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावे, असे मत आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, संघटन महामंत्री बाळा अंजनकर, चिंतामन रहांगडाले, सभापती छाया दसरे, नगरध्यक्ष अशोक इंगळे, धानेंद्र अटरे, पं.स.सदस्य गुड्डू लिल्हारे, सरपंच सुरेश पटले, अजाब रिनाईत, महेंद्र बघेले, उपविभागीय अधिकारी वालस्कर, तहसीलदार रवींद्र चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर तसेच शेतकरी-शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. विजय रहांगडाले शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, कर्जमाफी संदर्भात भाजप सरकारकडून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. शेतीचे उत्पादन खर्च कमी करून व शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुढील काळात ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे. शेतकरी बांधवांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. तसेच पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगितले.ते पुढे म्हणाले, मतदारसंघात जलयुक्त शिवार अभियानातून मोठी विकास कामे झाली असून आपणही भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मतदारसंघात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून भूजल पातळी वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नाही. एक पीक घेणारा शेतकरी दुबार पीक घेत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळील नाले, बंधारे यांचे खोलीकरण झाले की नाही याची खात्री करून घ्यावी. यंदाच्या खरीप हंगामासाठी धान बियाणांसह अन्य बियाणांचा पर्याप्त साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. खताचीही कुठलीही कमतरता खरीप हंगामात जाणवणार नाही, याची काळजी सराकरने घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता न करता खरीप हंगामाला सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नागरिकांशी थेट संपर्क
By admin | Published: May 30, 2017 12:59 AM