गोंदिया : आमगाव नगर परिषद की नगर पंचायत याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. तर नगर परिषद समाविष्ट होण्यास आठ ग्रामपंचायतीने अद्यापही नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत हा तिढा सुटत नाही आणि या आठ ग्रामपंचायती आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत, तोपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांची दिशा स्पष्ट होणार नाही.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकारी सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला संपला. मात्र, कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या. परिणामी, निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुका अद्यापही घोषित केल्या नाही. त्यामुळेच मागील दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाच्या भरवश्यावर सुरू आहे.
गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत एकूण ५३ सर्कल आहे. आमगाव नगर परिषद झाल्यास आमगाव तालुक्यातील एक सर्कल कमी होणार आहे. तसे झाल्यास गोरेगाव तालुक्यात एक सर्कल वाढेल. जिल्हा परिषदेचा एक सर्कल १६ हजार मतदारांचा असतो. मात्र, आमगाव नगर परिषदेत लगतच्या पद्ममपूर, रिसामा, कुंभारटोली, बिरसी, किडंगीपार, बनगाव, माल्ही, आमगाव या ग्रामपंचायतींचा समावेश असून, या आठही ग्रामपंचायतींची संख्या १८ हजारावर आहे. त्यामुळे नगर परिषद झाल्यास या तालुक्यातील एक सर्कल कमी होईल; मात्र या ग्रामपंचायतींनी अद्यापही नगर परिषदेत समाविष्ट होण्यासाठी अद्यापही नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही.
ग्रामपंचायतींनी हीच भूमिका कायम ठेवल्यास आणि न्यायालयात गेल्यास पुन्हा पेच निर्माण होऊन निवडणुका लांबणीवर जावू शकतात. तर नवीन सर्कल तयार झाल्यास नव्याने आरक्षण काढावे लागेल, त्यामुळे या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ लागू शकतो. त्यामुळे या आठ ग्रामपंचायतींच्या भुमिकेवर जिल्हा परिषद निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे.
कुणाच्या जागा वाढणार
पाच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २० जागा मिळविल्या होत्या. तर काँग्रेस १६ आणि भाजपला १७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन जिल्हा परिषदेत सहज सत्ता स्थापन करू शकले असते; पण गल्ली बंगाल्याच्या वादात सर्वाधिक जागा मिळूनही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. तर काँग्रेसने भाजपसह हातमिळवणी करीत जिल्हा परिषदेत अभद्र युती केली होती; पण या निवडणुकीत थोडे वेगेळे चित्र आहे. तर सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे कुणाच्या जागा वाढणार, हे सुद्धा महत्त्वपूृर्ण ठरणार आहे.
एकाला चलो रे वरच भर
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीची सत्ता आहे; मात्र हेच चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम राहण्याची शक्यता कमी आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर एकला चलो रेचा नारा देत तयारी सुरू केली आहे.