महिला कर्मचाऱ्यांची कुचंबना : निर्मल भारतला उडविला फज्जातिरोडा : स्थानिक तहसील कार्यालयातील संडास, मूत्रिघरामध्ये घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याचे पाणी असलेल्या मशीन जवळ खूपच घाण असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. कार्यालयातील संडास, मूत्रिघराचा वापर सर्वसामान्य नागरिक किंवा कार्यालय कर्मचारी सध्या तरी करूच शकत नाही इतकी घाण पसरलेली आहे. पुरूष कर्मचारी शौचालयाकरीता बॉटल घेऊन बाजूच्या परिसरात जातात. महिला कर्मचाऱ्यांना शौचालय नाही. तालुक्यातील नागरिक विविध कामानिमित्त तहसील कार्यालयात येतात. त्यांना कामासाठी चकरा माराव्या लागतात. स्वच्छतेच्या बाबतीत लोकमतने बातमी प्रकाशित केली होती. तञया बातमीची दखल घेत आ. विजय रहांगडाले यांनी प्रधानमंत्री यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कार्यालय स्वच्छ असायलाच पाहिजे त्यानुसार जिल्हाधिकारी गोंदिया यांना पत्र लिहून कार्यवाही करण्याची मागणीही केली होती. त्यानंतर तहसील कार्यालयातील शौचालय व मूत्रिघर इतर परिसर स्वच्छ करण्यात आला होता. त्यानंतर मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे निर्माण झालेली आहे. कर्मचारी व सामान्य नागरिकांची शौचालय, मूत्रिघरात घाण असल्याने अडचण होत आहे. महिला, नागरिक व कर्मचाऱ्यांना शौचालय, लघुशंकेकरिता कुठे जावे हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. एकीकडे प्रधानमंत्री स्वच्छता मोहीम राबविते तर दुसरीकडे शासकीय कार्यालयातच घाणीचे साम्राज्य असते याकडे जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन स्वच्छता ठेवण्यास आदेश द्यावे व दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी तिरोडा तालुकावासीयांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)वृध्दांचे अनुदान तीन महिन्यांपासून बंद तहसील कार्यालयामार्फत श्रावणबाळ योजना, वृध्दापकाळ योजनेचा लाभ वृध्दांना देण्यात येतो. परंतु मार्च २०१६ पासून निधी अभावी अनुदान वाटप न झाल्याने लाभार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. श्रावणबाळ योजनेचे ९७९ व वृध्दापकाळ योजनेचे ३ हजार ३३२ लाभार्थी आहेत. त्यांना मार्चपासून अनुदान न मिळाल्याने वृध्दांना तहसील कार्यालयाच्या चकारा काढाव्या लागत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य
By admin | Published: June 26, 2016 1:37 AM