कुलुप ठोकण्याचा इशारा : जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्षपरसवाडा : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वर्ग ११ व १२ साठी सहा पदे मंजूर असून फक्त दोन शिक्षक कार्यरत आहेत तर चार शिक्षक रिक्त आहेत. यात मराठी व इतिहास शिक्षकच असल्याने इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. नववी ते दहावी वर्गासाठी सहा पदे मंजूर असून दोन रिक्त आहेत. यात कला व विज्ञान विषयाचे शिक्षकच नाही. वर्ग सहावी ते आठवीसाठी सहा शिक्षक असून दोन रिक्त आहेत व पाचवीसाठी एक पद रिक्त आहे. यामुळे विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत असून जि.प. शिक्षण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. एकीकडे शिक्षणाधिकारी प्रकल्पाचा उदो उदो करतात, पण रिक्त शिक्षकांची पूर्तता का करीत नाही, यासाठी शासन स्तरावर उदो उदो का करीत नाही. शिक्षकांची कमतरता असेल तर विद्यार्थ्यांना कोण शिकविणार. शिक्षकांची पदे त्वरित भरुन व बदली झालेले शिक्षक त्वरित रुजू करण्याचे आदेश देण्यात यावे. शाळेतून तीन शिक्षकांची बदली करण्यात आली व त्यांना रुजूही करण्यात आले. पण दुसऱ्या शाळेतून येणारे शिक्षक तीन महिन्यांचा काळ लोटूनही रुजू झाले नाही. तरी प्रा. कावळे यांना त्याच शाळेत रुजू करण्यासाठी फेरविचार करण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धमेंद्र टेकाम, रवी मेश्राम, बाळू सोनवाने, बोपचे, सुभाष बोपचे, हिंगे, निता हिंगे, कोटांगले, इतर सर्व सदस्यांनी केली आहे. आठ दिवसांत शिक्षक न दिल्यास कुलूप कोणत्याही दिवशी ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)
शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान
By admin | Published: October 06, 2016 1:02 AM