लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : निवडणूक प्रशिक्षणाचे कारण दाखवून शाळेला बुट्टी मारणाऱ्या मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, प्रयोगशाळा सहायक व प्रयोगशाळा परिचराच्या अंगलट हा प्रकार आला आहे. पंचायत समिती सदस्यांच्या तक्रारीवरून दवनीवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील या सात कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.सविस्तर असे की, दवनीवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य डोहळे, सहायक शिक्षक एस.एस.जाधव, ओ.के.डोंगरवार, एच.एन.चापले, एम.एस.चव्हाण, प्रयोगशाळा सहायक झेड.वाय.पटले व प्रयोगशाळा परिचर आर.सी.धुवारे यांची विधानसभा निवडणुकीसाठी ड्यूटी लावण्यात आली होती. यासाठीचे प्रशिक्षण २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ वाजतापर्यंत आयोजित करण्यात आले होते. पण २८ सप्टेंबर रोजी शनिवार होता व शाळेची वेळ सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंतची होती. यामुळे मुख्याध्यापकांसह संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहणे अपेक्षीत होते.मात्र प्राचार्य कोहळे यांच्यासह संबंधितांनी शाळेत न येता बुट्टी मारली व गैरहजर राहिले. शाळेत न जाता आदल्या दिवशीच इलेक्शन प्रशिक्षण सुटीची स्वाक्षरी केली. मात्र त्याच दिवशी सकाळी ९.३० वाजता पंचायत समिती सदस्य गुड्डू लिल्हारे, शाळा समितीचे सदस्य व पालक शाळेत गेले असता विद्यार्थी पटांगणात भटकताना दिसले. शाळेत जाऊन विचारपूस केली असता प्राचार्यांसह संबंधित शिक्षक, प्रयोगशाळा सहायक व परिचर गैरहजर आढळले. यावर लिल्हारे यांनी रितसर हजेरीपत्रक बघीतले असता निवडणूक प्रशिक्षणाला जात असल्याचे नमुद होते पण वेळ टाकली नव्हती.त्यांचे आदेश बघितले असता दुपारी २ ते ५ वाजतापर्यंत प्रशिक्षण होते. तरिही संबंधितांनी शाळेत हजर न राहता सुटी मारली. म्हणजेच शिक्षकांनी विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान केले. शिक्षकाचा कायदा २००९ महाराष्ट्र शासन बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियमानुसार सकाळी ७ वाजता त्यांनी शाळेत येणे आवश्यक होते. करिता त्यांच्यावर शासन निर्णयानुसार कारवाई करण्याबाबत लिल्हारे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.तक्रारीवरून सातही कर्मचारी प्राथमिक चौकशी अहवालात दोषी आढळल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होणार असल्याचा चौकशी अहवाल तक्रारदार लिल्हारे यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्याध्यापक व शिक्षकांवर शिस्तभंगाची कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 6:00 AM
प्रशिक्षण २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ वाजतापर्यंत आयोजित करण्यात आले होते. पण २८ सप्टेंबर रोजी शनिवार होता व शाळेची वेळ सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंतची होती. यामुळे मुख्याध्यापकांसह संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहणे अपेक्षीत होते. मात्र प्राचार्य कोहळे यांच्यासह संबंधितांनी शाळेत न येता बुट्टी मारली व गैरहजर राहिले.
ठळक मुद्देप्रशिक्षणाच्या नावावर मारली बुट्टी : दवनीवाडा शाळेतील शिक्षकांचा प्रताप