तिरोडा : कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात येताच आता जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तिरोडा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसची पकड मजबूत करण्यासाठी एका माजी आमदाराचा पक्षात प्रवेश करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी आमदारांकडूनही ग्रीन सिग्नल मिळाला असून, लवकरच मुंबई येथे प्रवेश होणार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी त्यांनी विधानसभा क्षेत्रात वट असणाऱ्या एका माजी आमदाराची त्याच्या कार्यकर्त्यांसह एन्ट्री करण्याची तयारी सुरू केली आहे. हे माजी आमदार येत्या १९ जून रोजी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
तिरोडा तालुका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा गोरेगाव तालुक्यातील काही भाग आणि तिरोडा तालुका मिळून विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे, तर त्या तुलनेत काँग्रेसचे वर्चस्व फार कमी आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत बंडखोरी होत असल्यामुळे याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसत आहे, तर याचा फायदा भाजपला होत आहे. नेमकी हीच बाब हेरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मतदारसंघात पक्षाची ताकद वाढविण्याकडे लक्ष घातले आहे. ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी या माजी आमदाराची भेटसुद्धा घेतली होती. त्यांच्यात या विषयावर १ तास चर्चाही झाल्याची माहिती आहे. माजी आमदाराने आपल्या कार्यकर्त्यांचा कल घेऊन यावर निर्णय घेऊ, असे पटोले यांना सांगितले होते. मात्र, आता जवळपास काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय झाला असून, १९ जून रोजी मुंबई येथे पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरात सुरू आहे.
......
जिल्हा परिषद निवडणुकीवर डोळा
गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला पूर्ण झाला आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे जि.प.च्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून लवकच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेत आता पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला आहे.