बिरसी-फाटा : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने खंडविकास अधिकारी प्रकाश गंगापारी यांची बुधवारी (दि.२४) भेट घेऊन त्यांच्या दालनात चर्चा करण्यात आली.
गटशिक्षणाधिकारी एम. डी. पारधी व अधीक्षक मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेत शाळांचे वीजबिल भरण्याचा विषय मांडण्यात आला. यावर गंगापारी यांनी त्वरित ग्रामपंचायतने बिल भरण्याचे आदेश गटविकास अधिकारी धारगावे यांना दिले व तसे आदेश सर्व ग्रामपंचायतींना देण्यास सांगितले. मेडिकल बिल, सेवानिवृत्त शिक्षक व इतर थकबाकींच्या निधीसाठी गटशिक्षणधिकारी व गटविकास अधिकारी ह्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने जिल्हा परिषदकडे त्वरित मागणी करु असे सांगितले. चट्टोपाध्याय वेतन श्रेणीच्या विषयात लगेच कार्यवाही करण्यात येणार असे सांगितले. शिक्षकांच्या प्रत्येक विषयांवर गांभीर्याने चर्चा करुन पंचायत समितीकडून केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा सभा १२ एप्रिल रोजी घेणार असे सांगितले. संचालन एच.एम. रहांगडाले यांनी केले. प्रास्ताविक डी. डी. रिनाईत यांनी मांडले. आभार तुषार ढोमणे यांनी मानले. शिष्टमंडळात संघाचे राज्य पदाधिकारी जितेंद्र डहाटे, कार्याध्यक्ष के. एस. रहांगडाले, संघटक एम. बी. रतनपुरे, तालुका नेते के. एस. मेश्राम, तालुकाध्यक्ष एच. एम. रहांगडाले, सरचिटणीस तुषार ढोमणे, जिल्हा उपाध्यक्ष डी. डी. रिनाईत, डी. एल. गजभिये, कार्यालयीन चिटणीस वासुदेव न्यायकरे, कोषाध्यक्ष विजय भगत, जी. बी. ठाकरे, संतोष पारधी, धनपाल पटले व पदाधिकारी उपस्थित होते.