तिरोडा : तिरोडा शहर व ग्रामीण भागात बत्ती गुल होणे, रीडिंग न घेता अवाजवी बिल पाठविणे, वीजपुरवठा सुरळीत सुरू आहेत किंवा नाही याची तपासणी न होणे आदी अनेक समस्यांना घेऊन तालुका पत्रकारसंघाने महावितरणचे उपविभागीय अभियंता दखणे यांची मंगळवारी (दि.१५) भेट घेऊन चर्चा केली.
सर्वप्रथम वारंवार वीजपुरवठा खंडित होणे व त्यामुळे शासकीय-खासगी रुग्णालय, उद्योग-व्यापार तसेच नागरिकांना होणाऱ्या अनेक समस्या तालुका पत्रकारसंघाने मांडल्या. शिवाय नागरिकांच्या तक्रारींवर कनिष्ठ अभियंता दुर्लक्ष करीत असून, कार्यालयातील फोनसुद्धा कुणी उचलत नसल्याचे सांगण्यात आले. यावर दखणे यांनी येत्या आठवडाभरात शहरासाठी वेगळे यंत्र सुरू करण्यात येणार असल्याने वीज दाबाची समस्या मार्गी लागेल, असे सांगितले. तसेच नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी अधिनस्त कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देणार असून, समस्या मार्गी लावण्यासाठी दक्षता त्वरित दक्षता घेण्यात येईल, असे त्यांनी आश्वस्त केले. तसेच मीटर रीडिंग व अवाजवी बिल येणे हा विषय मांडण्यात आला. यावर दखणे यांनी, मीटर तपासणीसाठी तपासणी पथक नेमून त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
-------------------------
ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरण ॲप
नागरिकांच्या वीजबिल संबंधात वाढत्या तक्रारी बघून महावितरणाने महावितरण नावाचे एक अँड्रॉइड मोबाइल ॲप सुरू केले आहे. पण त्याच्या उपयोगाबाबत अद्याप जनजागृती झाली नाही. या ॲपमध्ये असलेला कॅमेरा ऑन करून वीजमीटरसमोर पकडल्यास तेथील रिडिंग ॲपमध्ये स्टोर होते. त्यानुसार आपण किती युनिट वीज वापर केली व त्याचे बिल किती होते हे समजते. त्याप्रमाणे ग्राहकांना त्वरित ऑनलाइन बिल भरणे सुगम होते. या ॲपचा ग्राहकांनी वापर करावा, असे दखणे यांनी कळविले आहे.