त्वरित उपाय योजना करा : गावात दरवर्षी पसरतो साथरोग लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील नवेगाव येथे दरवर्षी पावसाळ्यात हागवण या साथरोगाची लागण होते. नवेगावात यंदाही साथरोग पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावाच्या मधात असलेल्या बोडीतील घाणीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे बोडीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांचे जगणे कठीण झाले आहे. परंतु स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग झोपेत आहेत. नवेगावाच्या मधोमध एक बोडी आहे. त्या बोडीत स्वच्छतेअभावी सर्वत्र घाण पसरली आहे. मोठ्या प्रमाणात विषयुक्त वनस्पतीसुध्दा आहेत. त्यातच या बोडीत म्हशी व रेडे आणि डुकरे वावरत असतात. त्यामुळे घाणच-घाण पसरली आहे. आता पावसाचे पाणी बोडीत साचले. परंतु बोडीतून पाण्याची निकास कधीच होत नाही. त्यामुळे घाण व मृत वनस्पती सडल्यामुळे त्यातून दुर्गंधी येत आहे. बोडीच्या एका बाजूला मुख्य रस्ता आहे. या बोडीच्या आजूबाजूला वास्तव्य करणाऱ्यांना बोडीच्या दुर्गंधींचा सामना करावा लागत आहे. एवढेच नाही तर रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांना तसेच नजीकच्या दुकानदारांनासुध्दा बोडीतील दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुकानावर उभे राहणे किंवा रस्त्यावरुन ये-जा करणेही कठीण झाले आहे. रिपरिप पावसामुळे साथरोग पसरू शकतो. दिवसेंदिवस बोडीच्या दुर्गंधीत वाढ होताना दिसत आहे. अशात गावात अतिसार पसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पावसाळ्यात सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य नाल्यांची व्यवस्था नाही. विहिरी आणि बोअरवेल असलेल्या परिसरात खताचे खड्डे असल्याने पिण्याचे पाणी दूषित होत आहे. या दूषित पाण्यामुळे कावीळ, हगवण, उलट्या असे आजार होण्याची दाट शक्यता आहे. गावात साथरोग पसरण्याची दाट शक्यता असताना ग्रामपंचायतकडून गावात कोणतीही उपाययोजना होताना दिसून येत नाही. पाणी शुध्द करण्यासाठी नागरिकांना ब्लिचिंग पावडरही देण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
बोडीच्या दुर्गंधीमुळे साथरोगाचा धोका
By admin | Published: July 17, 2017 1:18 AM