गोंदिया : वनेतर कामांकरिता वनमजुरांचा वापर करण्यात येऊ नये, असा आदेश महसूल व वनमंत्रालयाने काढला. परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप होताना दिसत नाही. नवेगावबांध येथील प्रकाष्ठ निष्कासन अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर तीन वर्षापासून एक महिला आणि एक पुरूष वनमजूर राबत असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेने केला आहे. त्याची चलचित्रफीत त्यांनी तयार करून वरिष्ठांकडे पाठविली आहे.नवेगावबांध येथे वनविभागाचे मोठे जंगल आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली आहे. मात्र कर्मचारी साहेबांच्या खासगी कामासाठी त्यांच्या बंगल्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी मनोहर गोखले यांचा नवेगावबांध येथे शासकीय बंगला आहे. बंगल्यावर वनआगारातील वनमजूर वाल्मिक राऊत आणि विमला टेकाम तीन वर्षापासून स्वयंपाक, धुनी भांडी, झाडू मारणे आदी कामे करीत असल्याची तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेने केली आहे. पूर्ण पगारी कर्मचाऱ्यांना घरी राबवून घेत असताना दुसरीकडे मात्र शासकीय कामांसाठी कंत्राटी मजूर ठेवून शासनाला अतिरीक्त भुर्दंड बसविण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून वनमजुरांच्या वेतनावर झालेला खर्च शासकीय निधी दोषी अधिकाऱ्याच्या वेतनातून शासन जमा करण्यात यावे, त्यांच्याविरोधात योग्य कारवाई करून भविष्यात कर्मचाऱ्यांचा खासगी कामासाठी वापर होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे तक्रारीत म्हटले आहे. महसूल व वनमंत्रालयाने वनमजुरांना वेतनेतर कामासाठी राबविण्यात येऊ नये, असे आदेश जानेवारीत जारी केले आहेत.
वनाधिकाऱ्याच्या बंगल्यावर वनमजूर
By admin | Published: April 12, 2015 1:23 AM