तिरोडा : राज्यात कोरोना महामारीवर आळा बसावा, याकरिता अनेक अभियान राबविले जात असून, त्यात स्वच्छ भारत अभियानाचाही समावेश आहे. परंतु, शहरातील नेहरु वाॅर्डातील सार्वजनिक शौचालयाजवळील परिसरात वॉर्डातील लोक कचरा टाकत असल्याने शौचालय परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातून स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडताना दिसत आहे.
शहरात जिकडे - तिकडे घाण पसरली असूनही नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नेहरु वाॅर्डातील सार्वजनिक शौचालयाजवळ घाण पसरली आहे. रस्त्याच्या बाजुला टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेहरु वॉर्डातील सिमेंट रस्त्यावर माती आल्याने तिथे गवत उगवले. परंतु, नगर परिषद याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक प्रभागात माती, कचरा व कवेलू रस्त्यावर टाकण्यात आले आहे. याकडे नगर परिषदेचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.