अर्जुनी न.पं. : प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना अभिप्राय मागविलाअर्जुनी-मोरगाव : नगर पंचायत निवडणुकीनंतर पदाधिकारी सत्तारुढ झाले. भाजप व काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाची स्विकृत सदस्य म्हणून निवड झाली खरी, मात्र पात्रता निकषाच्या पूर्ततेवरून स्विकृत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांनी प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना ३० डिसेंबर रोजी अभिप्रायासह अहवाल मागविला आहे. प्राप्त माहितीनुसार, नगर पंचायतची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी पार पडली. यात १७ सदस्य निवडून आले. स्विकृत सदस्य नेमणुकीसाठी भाजप व काँग्रेसला प्रत्येकी एक सदस्य देण्याची संधी मिळाली. काँग्रेसतर्फे सर्वेश वल्लभदास भुतडा तर भाजपतर्फे हेमंत पंढरीनाथ भांडारकर यांची वर्णी लागली. नगर पंचायतच्या कार्यकारी मंडळ फलकावर त्यांचे नावही झळकले. मात्र प्रभाग क्रमांक ८ मधील रहिवाशी पुरूषोत्तम हरी लाडे यांनी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) यांच्याकडे ११ डिसेंबर रोजी तक्रार केली. या तक्रारीत स्विकृत दोन्ही सदस्यांनी सादर केलेल्या अर्हता पूर्ण केल्या नसल्यामुळे सभासदत्वास मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. या तक्रारीच्या आधारावर कार्यकारी मंडळ फलकावर नमूद दोन्ही स्विकृत सदस्यांच्या नावासमोर पट्टी लावण्यात आली आहे. तक्रारीनुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी ३० डिसेंबर रोजी पत्र काढून दोन्ही स्विकृत सदस्यांच्या नेमणुकीसंबंधी पात्रतेच्या अभिप्रायासह अहवाल मागविला आहे.(तालुका प्रतिनिधी)प्रभारी मुख्याधिकारी अनभिज्ञयेथे मुख्याधिकारी नसल्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतात. नवनिर्मित नगर पंचायतीचा कारभार चालविताना नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ३० डिसेंबरच्या पत्राविषयी प्रभारी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असता हे पत्र आले किंवा नाही ते बघून सांगता येईल, असे उत्तर त्यांनी दिले. पत्र आले असल्यास लवकरच अहवाल पाठवू, असे प्रभारी मुख्याधिकारी ए.एस.पाटील यांनी सांगितले. उपजिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल मागविला असताना पत्राविषयी त्यांची अनभिज्ञता हा अर्जुनी नगरीत चर्चेचा विषय झाला आहे.
स्वीकृत नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
By admin | Published: January 08, 2016 2:21 AM