लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : आमगाव पंचायत समिती कार्यालयातील मनरेगा विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचारी व्दारपाल बोपचे (रा. कोसमटोला) यांना मागील ४ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. हाती पैसे नसल्याने त्यांनी वीजबिल भरले नाही परिणामी महावितरण कंपनीने त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे बोपचे कुटुंबियांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
बोपचे हे मनरेगा विभागात कंत्राटी कर्मचारी असून, अत्यल्प मानधनावर नोकरी करत आहेत. सप्टेंबर २०१९नुसार त्यांना वाढीव मानधन मिळाले नाही. त्याचप्रमाणे मागील ४ महिन्यांपासूनचे मानधनही मिळाले नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ते वीजबिलाचा भरणाही करू शकले नाहीत. मानधन मिळाले नसल्याने वीजबिल भरण्यासाठी मला थोडी मुदत द्यावी, अशी विनंती बोपचे यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना केली. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष करुन २७ फेब्रुवारी रोजी बोपचे यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित केला. कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने सर्व जनता त्रस्त असताना या काळातील वीजबिल माफ करू, असे आश्वासन खुद्द ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्यामुळेच अनेकांचे वीजबिल थकले आहे. आधी वाढीव वीजबिलांची माफी घोषित करणाऱ्या ऊर्जामंत्र्यांनी नंतर माघार घेतल्यामुळे वीज ग्राहक संभ्रमित झाले आहेत. कोरोना काळातील वीजबिल माफ होईल, या अपेक्षेतून अनेकांनी बिलाचा भरणा केलेला नाही.
......
अनेकांना बसतोय भुर्दंड
आता मागील बिलाचे व्याज जोडून भरमसाट रकमेचे वीजबिल येत आहे. बिल भरणा केले नाही तर महावितरण विभाग वीज पुरवठा खंडित करत आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा हादरा बसला आहे. कदाचित त्यावेळी ऊर्जामंत्री राऊत यांनी बिल माफीची घोषणा केली नसती, तर ग्राहकांनी कसेबसे बिल भरले असते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना संकटात मदत करणं हे काम राज्य सरकारचे असते. अशातच आता भरमसाट येत असलेले वीजबिल कमी करावे व त्याचे ४-५ हप्ते पाडून बिल भरणा करण्यासाठी सवलत देण्यात यावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.