पोलीस अधीक्षकांचा विश्वास : राजकीय दडपणाला जुमानणार नाहीगोंदिया : शहरात हल्लीच्या काळात संघटीत गुन्हेगारी वाढत असली तरी या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी आपले कर्तव्य निष्पक्षपणे बजावून सामान्य जनतेला अभय द्यावे. कोणत्याही प्रकरणात राजकारण्यांचा हस्तक्षेप झाला तरी पोलीस कोणत्याही दडपणाला बळी न पडता आपले कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडतील, असा विश्वास जिल्ह्यात नव्याने रूजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.गेल्या काही दिवसात गोंदिया शहरात वाढलेली संघटीत गुन्हेगारी पाय पसरणार नाही, असा दिलासा त्यांनी दिला. नक्षलवाद्यांच्या कारवाया जिल्ह्यात कमी झाल्या असल्या तरी नक्षलग्रस्त भागात तेवढेच मनुष्यबळ सुरक्षेच्या दृष्टीने ठेवावे लागते. कामाचा ताण पोलिसांवर राहतोच. परंतु नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. जिल्ह्यात मनुष्यबळाची कमतरता नसून उपलब्ध मनुष्यबळात सर्व कामे व्यवस्थित होतील, असे ते म्हणाले.आता पोलीस हायटेक होत आहेत. सुरूवातीला संगणक, सीसीआय, त्यानंतर सीपा (कॉमन इंट्रीग्रेटेड पोलीस अप्लीकेशन) आता सीसीटीएनएस (क्राईम क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क स्टीस्टम) नुसार पोलीस विभागात काम होते. पोलीस ठाण्यातील तक्रार आता आॅनलाईन झाली आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती संपूर्ण भारतात आॅनलाईन पाहता येते. सर्व प्रकारचे गुन्हे या आॅनलाईन पध्दतीने पाहता येतात. जिल्हा पोलीस दलाला फायरिंगच्या प्रॅक्टीससाठी मिळालेले फायर सिम्युलेटर नादुरूस्त झाल्याने बंद आहे. मात्र ते लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिम्युलेटरच्या दुरूस्तीसाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव महासंचालकांकडे पाठविला होता. त्यावर लवकरच तोडगा निघून सिम्युलेटर सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांच्या निवासस्थानांची दूरवस्था आहे. ‘लोकमत’ने वेळोवेळी हा विषय छेडला आहे. पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न गंभीर असल्याची कबुली देताना त्यांनी सांगितले की, गोंदियातील मनोहर चौकातील पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था आहे. या जीर्ण वसाहतीला तोडून १३२ नवीन पोलीस क्वार्टर तयार करण्यात येणार आहेत. दीड कोटी रूपयांतून अर्जुनी-मोरगावचे पोलीस ठाणे व वसाहत तयार करण्यात येणार आहे, असे डॉ.भुजबळ यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)इंडेक्स ट्रेनिंग गोंदियातनक्षलविरोधी अभियानाचे प्रशिक्षण गोंदियात देण्यात येणार आहे. नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी सी-६० पथकात सहभागी होणाऱ्या जवानांना २१ दिवसांचे इंडेक्स ट्रेनिंग पोलीस मुख्यालय कारंजा येथे देण्यात येणार आहे. गोंदिया पोलिसांकडे सर्वच प्रकारचे शस्त्रास्त्र असून एलआरपी, एसआरपी, अँबुस यांचे प्रशिक्षण गोंदियात दिले जाणार असल्याची माहिती डॉ.भुजबळ यांनी दिली.
कर्तव्यातूनच बसवणार गुन्हेगारीवर वचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2016 1:32 AM