आदिवासी विकास महामंडळ आघाडीवर : मार्केटिंग फेडरेशनकडे ६.८१ कोटींचे चुकारे थकित देवानंद शहारे गोंदिया धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात माकेटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या एकूण १०० धान खरेदी केंद्रांवरून तब्बल १४ लाख ४५ हजार ४६० क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यासाठी ४५ हजार ८०४ शेतकऱ्यांना दोन अब्ज पाच कोटी ६६ लाख ३८ हजार १७०.३० रूपये चुकाऱ्यापोटी वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे २०१६-१७ या आर्थिक वर्षात विलंबाने धान खरेदी केंद्र सुरू झाल्याची शेतकऱ्यांची बोंब होती. मात्र धान खरेदी सुरू झाल्यावर धान साठविण्यासाठी गोदामातील जागासुद्धा अपूरी पडल्याचे दिसत होते. त्यातच मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्ह्यातील एकूण ५७ केंद्रांवरून आठ लाख ६० हजार ११२.३९ क्विंटल धान खरेदी २९ मार्चपर्यंत करण्यात आले. त्यासाठी १२६ कोटी ४३ लाख ६५ हजार २१३.३० रूपये एवढ्या रकमेचे चुकारे शेतकऱ्यांना वाटप करावयाचे होते. त्यापैकी ११९ कोटी ६१ लाख ७६ हजार ५५१.५० रूपयांचे चुकारे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. तर सहा कोटी ८१ लाख ८८ हजार ६६१.८० रूपयांचे शेतकऱ्यांचे चुकारे मार्केटिंग फेडरेशनकडे प्रलंबित असून, ही आकडेवारी २९ मार्च २०१७ पर्यंतची आहे. जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या एकूण ४३ धान खरेदी केंद्रांवरून २० हजार ३५२ शेतकऱ्यांकडून ३१ मार्च २०१७ पर्यंत पाच लाख ८५ हजार ३४८.०४ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. त्यासाठी ८६ कोटी ०४ लाख ६१ हजार ६१८.८० रूपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना चुकारे म्हणून वाटप करावयाची होती. उल्लेखनिय म्हणजे आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यांची सर्वच १०० टक्के रक्कम नियमित वाटप केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आता उन्हाळी धानपिकांचा हंगाम सुरू आहे. हे धान लवकरच शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांची गरज भासणार आहे. शासनाच्या आदेशानुसार १ मे पासून जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. ही धान खरेदी २६ जूनपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे उन्हाळी धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना इतरत्र भटकावे लागणार नाही. ३.०८ कोटींचा बोनस वाटप यावर्षी प्रतिशेतकरी ५० क्विंटलपर्यंतच बोनस वाटप करण्याचे आदेश आहे. त्यामुळे ५० क्विंटलच्या वर धान असलेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळणार नाही, तर त्यापेक्षा कमी धान असलेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळणार असल्याची माहिती आहे. मार्केटिंग फेडरेशनने २९ मार्चपर्यंत २०० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे ३ कोटी ८ लाख ३३ हजार २४९ रूपयांचे बोनस वाटप केले आहे. काही शेतकऱ्यांना बोनस मिळणे बाकी आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून अद्याप बोनस वाटप झाले नाही. तर सद्यस्थितीत बोनससाठी शेतकऱ्यांची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. यादी तयार झाल्यानंतर शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ४.९३ लाख क्विंटल धानाची भरडाई बाकी जिल्ह्यातून खरेदी झालेल्या एकूण धानापैकी नऊ लाख ५१ हजार ८५८ क्विंटल धानाची भरडाई (मिलिंग) झालेली आहे. तर चार लाख ९३ हजार ६०२.०४ क्विंटल धानाची भरडाई होणे बाकी आहे. यात माकेटिंग फेडरेशनच्या पाच लाख ९२ हजार ८०० क्विंटल धानाची भरडाई झाली, तर दोन लाख ६७ हजार ३१२ क्विंटल धानाची भरडाई होणे बाकी आहे. तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या तीन लाख ५९ हजार ०५८ क्विंटल धानाची भरडाई झाली आहे, तर दोन लाख २६ हजार २९०.०४ क्विंटल धान बाकी आहेत. टक्केवारी बघता आदिवासी महामंडळाच्या ६० टक्के धानाची मिलिंग झाली आहे, तर ४० टक्के बाकी आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या ६९ टक्के धानाची मिलिंग झाली आहे, तर ३१ टक्के धान बाकी आहेत.
४५ हजार ८०४ शेतकऱ्यांना २.०५ अब्जचे चुकारे वाटप
By admin | Published: April 06, 2017 12:59 AM