गोंदिया : खरीप हंगामात खते, बियाणे,शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना नाबार्ड आणि शासनाच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जाते. यंदा खरीप आणि रब्बी हंगामासाठी एकूण ३०० काेटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात २०० कोटी रुपयांचे पीक कर्ज खरिपासाठी वाटप करण्यात येणार असून यापैकी आतापर्यंत १२० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून पीक कर्ज वाटपास सुरुवात करण्यात आली. राज्य शासन आणि नाबार्डने गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १६७ कोटी ८५ लाख, राष्ट्रीयीकृत बँकेला ९ कोटी १६ लाख रुपये व ग्रामीण बँकांना ३ कोटी ६० लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी पैशाची गरज असते. पैशाची गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. सध्या पीक कर्जाची उचल करण्यासाठी शेतकऱ्यांची बँकांमध्ये गर्दी दिसून येत आहे. आतापर्यंत सर्वाधिक ७६ कोटी ६६ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप जिल्हा बँकेने केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेने १ कोटी २० लाख आणि ग्रामीण बँकांनी १ कोटी ३० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.
............
२६ हजार ५७२ शेतकऱ्यांनी केली पीक कर्जाची उचल
जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली असून आतापर्यंत एकूण २६५७२ शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल केली आहे. यात सर्वाधिक १६७८५ शेतकरी जिल्हा बँकेतून पीक कर्जाची उचल केली आहे; मात्र राष्ट्रीयीकृत बँकांची पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया अद्यापही संथगतीनेच सुरु आहे.
...............